येळसे : पावसाने उघडीप दिल्याने पवन मावळात भात कापणी व झोडणीला वेग आला आहे. यावर्षी मजुरांची टंचाई जाणवत असल्यामुळे जास्त पगार देवून बाहेर गावाहून मजूर आणावे लागत आहेत. खरीप हंगामामध्ये जून महिना संपताना व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये झालेल्या लागवडीची कापणी सुरू झाली आहे. शेतकरी सकाळी लवकर भात कापणी करत असून दुपारी भात झोडून घरात सुरक्षित ठेवत आहेत. सध्या गावोगावी भात कापणी आणि झोडणी सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई भासत असून मजुरीचे पगारही गगनाला भिडले असल्याचे भडवली येथील शेतकरी रघुनाथ लोहर यांनी सांगितले. भडवली येथे भात झोडणीच्या वेळी कृषी सहायक दत्तात्रय गावडे उपस्थित होते.
पवन मावळात भात कापणी झाली की शेतकरी ओलीवर हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची पेरणी करत असतात. त्यामुळे भात पिकाची कापणी व झोडणी करून लवकरात लवकर शेत तयार करायची लगबग शेतकर्यांमध्ये दिसून येत आहे.
यावर्षी चांगला पाउस झाल्यामुळे शेतकरी आनंदात दिसत आहे. यावर्षी पवन मावळात शिलिंब, कोर्थुेणे, भडवली, कालेपासून ते चांदखेड पुसाणे, कुसगाव पमा आदी गावांमध्ये भात पीक जोमात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी भातझोडणीला वेग आला आहे.
– विकास गोसावी, कृषी सहायकपवन मावळात या वर्षी भात पीक चांगले आले असून, कृषी विभागाने भात उत्पादन वाढीसाठी केलेल्या बियाणे बदल, बीजप्रक्रिया, पीक प्रात्यक्षिक, चारसूत्री, एसआरटी लागवड, क्रॉपसॅपद्वारे कीड व रोग व्यवस्थापन, शेतीशाळा यामुळे शेतकर्यांमध्ये जनजागृती झाली आहे. याचा भाताच्या उत्पादन वाढीला फायदा होणार आहे.
– दत्ता शेटे, मंडळ कृषी अधिकारी