भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्यात परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यावर शेतकर्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या काढणीस लगबग सुरू केली आहे. भात हे प्रमुख पीक असून, सुमारे 7500 हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने हळव्या आणि गरव्या जातीच्या भात पिकांचा समावेश आहे. यात इंद्रायणी, बासमती, पार्वती, सोनम, रत्नागिरी 24, आंबेमोहर या भाताचे उत्पादन घेतले जाते.
भोरच्या पश्चिम खोर्यांत भात कापणीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. शेतकर्यांची दिवाळी ही पावसाच्या भीतीच्या सावटाखाली गेली. त्यामुळे, आता भात कापणी हीच शेतकर्यांची खरी दिवाळी ठरणार आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरादेवघर धरण भागात भात काढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वर्षी उशिरा पाऊस, उशिरा लागण त्यामुळे उशिराच भात काढणीला सुरुवात झाली आहे. काल परवा पर्यंत पडत असलेल्या पावसामुळे भात खाचरात पाणी अजून साचले आहे. त्यामुळे भात कापणी व पाण्यातून भात पीक बाहेर काढताना शेतकरयंना त्रासदायक होत आहे. सतत पडलेल्या पावसाने
यंदाची भात काढणी त्रासदायक ठरत आहे. खाचरातील असलेल्या पाण्या मुळे कापलेले भात ठेवताना अडचण येत आहेत. त्यामुळे जास्तीचा वेळ व मंजूर संख्येत वाढ होत आहे. त्यात पावसाची भिती मनात आहेच.
पावसाच्या भीतीमुळे भात कापून खळ्यावर नेऊन लगेच झोडणी करून झोडलेल्या भाताचे उडवे रचून ठेवले जाणार आहेत. प्रामुख्याने हाळव्या जातीचे भात पीक कापणीस तयार झाले असल्याने पुढील काही दिवस भात काढणीच्या कामाची लगबग राहणार आहे. त्यामुळे मजुरांचा तुटवडा भासण्याचीही शक्यता आहे. तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून 7500 हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यातील सर्वाधिक लागवड पश्चिम भागात केली जाते. भात पिकाच्या उत्पादनावर येथील शेतकरयंची वर्षभराची उपजीविका अवलंबून असते.
यावर्षी लागवड झाल्यावर निरादेवघर खोर्यात सततच्या व झालेल्या अतिवृष्टीमुळे काही शेतकर्यांचे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने भात पिकांच्या काढणीला सुरुवात झाली असून, सध्या भात काढणीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्यामुळे कामाला मजूर मिळत नाहीत. कापणीला आलेल्या भाताच्या शेतात राखण करुनही रानडुकरांचा कळप शिरत असल्यामुळे भाताच्या ओब्या पडून पिकाचे मोठे नुकसान होत आहे. पहिले पावसाने आणि आता डुकरांमुळे नुकसान होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.