भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील म्हसर, करंजगावसह हिर्डोशी खोर्यात इंद्रायणी भाताच्या ओंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना शेवटचा पाऊस न पडल्याने इंद्रायणी भाताचे पळंज तयार झाले आहेत. या भाताचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. भोर तालुक्यातील हिर्डोशी भागाला इंद्रायणी भात पिकाचे आगर म्हणून ओळखले जाते. या वर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे इंद्रायणी भात पिकाची अनियमित वाढ झाली. भात पीक ओंबी पोषण्याच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने इंद्रायणी तांदळाचा उतारा कमी प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून, सुमारे 7 हजार 500 हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. इंद्रायणी या गरव्या भाताची सर्वाधिक लागवड असून, गरवा भात पीक असलेल्या इंद्रायणी भाताची वाढक्षमता 120 ते 130 दिवसांत होते. इंद्रायणी भात पिकांची वाढ होत असताना त्याला अतिवृष्टीचा फटका बसला. भात पिकाला मोहर येण्याच्या काळात पाऊस गायब झाल्याने भात पिके पळंजावर गेले असल्यामुळे यांचा परिणाम भात पिकांच्या उतार्यावर होणार आहे. तांदळाचा उतारा कमी प्रमाणात आल्याने तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे इंद्रायणी तांदळाचा दर 20 ते 25 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरा देवघर व भाटघर धरण भागात भात हे प्रमुख पीक आहे. भात पिकावर येथील लोकांचे आर्थिक साधन असून, भाताच्या उत्पन्नावरच कुटुंब चालते. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे या वर्षी शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे भात पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
– संजय मळेकर, किसान सेल अध्यक्ष, काँग्रेस