पुणे

पिंपरी : पर्यटनासाठी एसटीचे पॅकेज टूर

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : थंडीला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांचा कल पर्यटनाकडे वाढला आहे. शहराच्या आसपासच्या ठिकाणांना अनेक नागरिक भेटी देतात. यामुळे एसटी प्रशासनाने पॅकेज टूरची सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली आहे. यासाठी तीस ते चाळीस प्रवाशांचा ग्रुप असणे आवश्यक आहे.

सुरक्षित होणार प्रवास
माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, कोकण व हरिहरेश्वर आदी ठिकाणांना नागरिक आवर्जून भेटी देत आहेत. यासाठी खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत असून, प्रवाशांची लूट करीत आहेत. मात्र, एसटीने पुढाकार घेत अतिशय स्वस्तात आणि सुरक्षितरित्या सेवा देत पॅकेज टूरची सोय केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून ही सेवा दिली जात आहे.

थेट घरपोच येणार एसटी
वल्लभनगरमधून एसटी थेट प्रवाशांच्या घरापर्यंत किंवा ग्रुप समूहापर्यंत येणार आहे. त्यानंतर त्यांना नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्टँडपर्यंत जाण्याची गरज भासणार नसल्यामुळे वेळ व पैसे दोन्हीही वाचणार आहे.

प्रवाशांच्या इच्छेनुसार विश्रांतीची सोय
प्रवाशी ग्रुपच्या इच्छेनुसार एसटी विश्रांतीसाठी मुक्कामी थांबणार आहे. मात्र, यासाठी मुक्कामाचा अतिरिक्त भार पर्यटकांनाचा भरावा लागणार आहे. हॉटेल, धर्मशाळा आदी राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी एसटीचा मुक्काम होतो.

एसटीकडून मोठ्या ग्रुपला कमी दर
एसटीकडून मोठ्या ग्रुपला कमी दरात ही सुविधा दिली जात आहे. खासगी ट्रॅव्हल्स पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारतात. त्या तुलनेत मात्र एसटीचे दर अतिशय कमी असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे.

कोरोना काळात नागरिकांनी लॉकडाऊनचा कहर सहन केला आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर मात्र, नागरिकांचा पर्यटनाकडे कल वाढल्याचे चित्र आहे. कोरोनापूर्वी पॅकेज टूरची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात होती. आता पुन्हा ती सुविधा सुरू करण्यात आली आहे.

                                                       -स्वाती बांद्रे, व्यवस्थापक, वल्लभनगर

SCROLL FOR NEXT