वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : राजगड (वेल्हे), तोरणागड भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. वाजेघर खुर्द, चर्हाटवाडी, वांगणी, मेंगजाईवाडी या ठिकाणी शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र दुर्गम चांदर, वरोती, खाणू, टेकपोळे, मेटपिलावरे, वाजेघर बुद्रुक आदी ठिकाणी अद्याप शासकीय टँकर सुरू झाला नाही, त्यामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वरोती, वाजेघर बुद्रुक गावांत खासगी जीप, ट्रॅक्टरमधून पाणी विक्री सुरू आहे.
सर्वांत गंभीर स्थिती पानशेत धरणखोर्यातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील चांदर, टेकपोळे आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांत आहे. पिण्यासाठी तसेच जनावरे व वापरण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते, तर काही गावांत पाणी रेशनिंग पध्दतीने सोडले जात आहे.
वाढत्या उन्हाबरोबर पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. माणसांसह जनावरांचे हाल सुरू आहेत. तातडीने टँकर सुरू केल्यास काही प्रमाणात गैरसोय दूर झाली आहे. मात्र, कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राजगड तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब निगडे यांनी केली आहे.
तीव्र टंचाईग्रस्त वांगणी गाव, वांगणीवाडी येथील मेंगजाईवाडी, चर्हाटवाडी व वाजेघर खुर्द या चार ठिकाणी शासनाच्या वतीने मोफत टँकर सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी टँकर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
– चेतन ठाकूर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, राजगड (वेल्हे) तालुका पंचायत समिती
पानशेत, तोरणासह तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील पाणी योजना पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच चांगला पाऊस पडेपर्यंत या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
– पंकज शेळके, गटविकास अधिकारी
हेही वाचा