ओतूर: ओतूर (ता. जुन्नर) परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. हे बिबटे जनावरांसह पाळीव कुत्र्यांना लक्ष्य करत होते. अलीकडे मात्र हेच बिबट्यांचे मानवांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या तीन घटना घडल्या आहेत. तसेच लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन घडू लागले आहे. त्यामुळे सायंकाळी 7 वाजेनंतर बिबटे दारात आणि नागरिक घरात अशी स्थिती झाली आहे.
गेल्या काही दिवासांपासून बिबट्या दररोज थेट गावठाणात फेरफटका मारू लागला आहे. कुमशेत येथील सिद्धार्थ प्रवीण केदार या अवघ्या 7 वर्षांच्या मुलाला बिबट्याने बुधवारी (दि. 24) आई-वडिलांसमोरून उचलून नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ओतूर ग्रामस्थांनी भलतीच धास्ती घेतली आहे. (Latest Pune News)
सलग एकापाठोपाठ एक होणारे हल्ले, तसेच दिवसाढवळ्या बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या गावात येणाऱ्या बिबट्यांचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ओतूरचे ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे संतप्त ओतूरकरांनी या बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, किंवा गावात एक तर बिबटे रहुद्या, अथवा आम्हाला राहू द्या, अशी भावना व्यक्त करत आहेत.
रेस्क्यू टीमचे सदस्य तसेच वनकर्मचारी यांनी रात्र गस्त सुरू करून नागरिकांना भयमुक्त करावे, ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बिबट्याच्या हल्ल्यात जखमींना देण्यात येणारी लस उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पहाटे उघड्यावर शौचालयास जाऊ नये, रात्री उघड्यावर झोपू नये, बिबटप्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जाताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावेत, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यात बिबटयामुळे अनेक जीव गेले आहेत. तर अनेकांना कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दररोज जीवन-मरणाशी संघर्ष करावा लागतो. असे असतानाही एकीकडे बिबट्याच्या जतनासाठी उपक्रम राबविले जातात. तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंजरा लावणे, बिबट्यांना जेरबंद करणे हा उपाय कुचकामी आहे. त्यामुळे बिबट्यांबाबत शासनाने तत्काळ ठोस उपाय योजना तयार करून ती अमलात आणावी. याबाबत केंद्रीय स्तरावरही उपाय मिळू शकतो.- संदीप गंभीर, अध्यक्ष, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, खांमुडी