ओतूर: एकेकाळी सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले, बारमाही वाहणाऱ्या मांडवी नदीने समृद्ध झालेले आणि दाट हिरवाईने नटलेले ओतूर आज उष्णतेच्या झळांनी होरपळताना दिसत आहे. मुंजाबाच्या डोंगरावरून वाहणारा गार वारा, महालक्ष्मी मंदिर परिसरातील आमराईतून दरवळणारा आंब्याच्या मोहोराचा सुगंध, श्रावणातील मुसळधार पाऊस आणि डोहात साचलेले पाणी हे ओतूरकरांच्या आठवणींचा अविभाज्य भाग होते.
मात्र, गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे आणि निसर्गाच्या ऱ्हासामुळे ओतूरचे हवामान बदलत चालले आहे.
पूर्वी गरजेपुरतीच झाडे तोडली जात होती. मात्र, आता रस्त्यांचे रुंदीकरण, खाणकाम, रिसॉर्ट व्यवसाय, पर्यटन आणि शेतीतील अडथळ्यांच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होत आहे. डोंगरावरील जंगल नष्ट झाल्याने मातीची धूप वाढली असून, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जात आहे. परिणामी विहिरींची पाणीपातळी खालावली असून, अनेक बोअरवेल्स 300 फूट खोलीपर्यंत जाऊनही कोरड्याच राहत आहेत.
एकेकाळी ‘थंड हवामानाचा भाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओतूरमध्ये आता एप्रिल-मे महिन्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. हवामान विभागाकडून ‘ऊष्णतेची लाट’ असा इशाराही दिला जात आहे. सावली देणारी झाडे नाहीशी झाल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. बारमाही वाहणाऱ्या नद्या आता जानेवारी-फेबुवारीतच आटू लागल्या आहेत.
जंगलतोडीमुळे डोंगरातील जलसाठे कमी झाले असून, नदी-ओढ्यांना मिळणारा नैसर्गिक पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ग््राामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
निसर्ग नष्ट झाला तर पर्यटनाचा उपयोग काय?
‘ज्या निसर्गासाठी पर्यटक येथे येतात, तोच निसर्ग नष्ट झाला तर पर्यटनाचा उपयोग काय?’ असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. विकास आवश्यक असला तरी तो निसर्गाच्या किमतीवर होऊ नये, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तरीही आशेचे किरण पूर्णपणे मावळलेले नाहीत.
मुंजाबाच्या डोंगरांवर आजही धबधबे कोसळतात, ओढे-नाले भरून वाहतात, मांडवी नदीला महापूर येतो आणि पावशा पक्ष्याचा आवाज पावसाची चाहूल देतो. निसर्ग अजूनही जिवंत आहे; मात्र, त्याचे मूळ स्वरूप टिकवण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकसहभागातून व्यापक मोहीम आवश्यक
वृक्षलागवड, डोंगर संवर्धन, जलसंधारण आणि अतिक्रमणांवर नियंत्रण यासाठी लोकसहभागातून व्यापक मोहीम राबवली तर ओतूरला पुन्हा हरवलेला गारवा मिळू शकतो. अन्यथा पुढील पिढ्यांना हिरवाईऐवजी उष्ण डोंगर आणि कोरड्या नद्या वारसा म्हणून मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.