भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी दिला. अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी भवानीनगर येथे बारामती-इंदापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी राजेंद्र सपकाळ, बाबासाहेब झगडे, विशाल भोईटे, मनोज घोळवे, राहुल घोळवे, शिवाजी रुपनवर, मधुकर वाघमोडे, हरिश्चंद्र घोळवे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, दि. 13 फेब्रुवारी रोजी पैठण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22 फेब्रुवारी 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसपी किसान गॅरंटी कायदा करावा, शेतकर्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, शेतीपंपाला दिवसा 12 तास वीजपुरवठा करावा, तोडलेली वीज तत्काळ जोडून देण्यात यावी, 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान त्वरित शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे, थकीत एफआरपी अधिक त्याचे व्याज शेतकर्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे, रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने अनुदान देऊन त्या किमती नियंत्रणात आणाव्यात, 37 टक्के संभाव्य वीजदर वाढीस संपूर्णपणे विरोध, शेतक-याचे थकीत वीजबिल पूर्ण माफ करावे, बुलढाणा येथे शेतकर्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी, कापूस व सोयाबीनला 12 हजार रुपये हमीभाव मिळावा, ज्या शेतकर्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्यांना पीक विमा त्वरित देण्यात यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.