पुणे

जवळे येथे मल्चिंग पेपरवर कांदा लागवड

अमृता चौगुले

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : शेतीमध्ये अलिकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकरी आवर्जून वापर करू लागले आहेत. त्यामध्ये शेतकरी यशस्वी देखील होऊ लागले आहेत. आता जवळे येथील शेतकरी अंकुश रामचंद्र गायकवाड या शेतकर्‍याने पारंपरिक पाटपाण्यावरील कांदा लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली आहे. यासाठी सेंद्रिय खते, औषधांचा वापर केला आहे.

जवळे येथील शेतकरी अंकुश रामचंद्र गायकवाड यांनी आठ एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली आहे. एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनासाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च येतो. परंतु, यामध्ये खुरपणीचा आणि मजुरीचा खर्च वाचतो. कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे औषध फवारणीचा खर्च येत नाही. परिणामी, ही लागवड करण्यात आली.

याबाबत माहिती देताना अंकुश गायकवाड म्हणाले, 'मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करताना एक एकर क्षेत्रासाठी सव्वादोन लाख रोपे लागतात. ही रोपे तयार करताना देखील सेंद्रिय खते, औषधांचा वापर केला. एकसमान लागवडीमुळे कांद्याचा आकार देखील एकसमान आणि चांगल्या प्रतीचा निघतो. थंडी, तापमान वाढ, धुके इत्यादी गोष्टींचा परिणाम 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

पाणी वाहते नसल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. परिणामी, मुळांची आणि कांद्याची देखील वाढ चांगली होते. मल्चिंगच्या प्रतिकारक किरणांमुळे रस शोषणार्‍या कीडरोगाचा प्रादुर्भाव पिकाकडे होत नाही तसेच माती व पानांचा संबंध न आल्यामुळे बुरशीचा देखील धोका संभवत नाही."

प्रयोग करणारे पूर्व भागातील पहिलेच शेतकरी
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये काढणी केलेला उन्हाळी कांदा बराकीत साठवल्यानंतर तो एक ते दोन महिन्यांतच सडून गेला. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परंतु, मल्चिंग पेपरवरील कांदे लवकर सडत नाहीत. त्यांची टिकाऊ क्षमता अधिक असते. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करणारे अंकुश गायकवाड हे पहिले शेतकरी ठरले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT