पुणे

चिंबळीत महिला शेतकर्‍याची सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेती

अमृता चौगुले

आळंदी (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : चिंबळी येथील प्रयोगशील शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे. विंटर डाऊन, स्वीट संशेशन, नाभिला या नामांकित वाणांच्या स्ट्रॉबेरी पिकाची फिनोलेक्स ड्रीप कंपनीचे मालक ऋषीकेश छाब्रिया यांनी पाहणी करत कौतुक केले.

भेटीप्रसंगी कंपनीचे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक प्रशांत जाधव, अधिकारी ललित भंडारी, प्रकल्प व्यवस्थापक सागर शिंदे, सहायक व्यवस्थापक राहुल चव्हाण, धनराज सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य काळूराम बनकर, शाळा समिती संचालक शामराव बहिरट, अर्जुन शिंदे, राजू जाधव, अनिकेत जाधव, पुष्पा चोरामले व इतर मान्यवर उपस्थित होते.

सेंद्रिय शेती करणार्‍या सीमा जाधव युवा महिला शेतकरी आहे. शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्याची त्यांची हातोटी
आहे. गेल्यावर्षी त्यांनी शेतात 10 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पादन घेतले. यंदा तर विषमुक्त स्ट्रॉबेरी पीक घेण्याचा चंग बांधत सेंद्रीय पद्धतीनेही यशस्वी उत्पादन घेतले. हे पीक पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत आहेत. त्यांनाही बहरलेल्या व रुचकर स्ट्रॉबेरीची चव घेताना सीमा जाधव यांच्या प्रयोगशीलतेचे अप्रूप वाटत आहे.

पंचक्रोशीतील शेतकर्‍यांकडून कौतुक
लागवडीसाठी विंटर डाऊन, स्वीट संशेशन, नाभिला या वाणांची रोपे महाबळेश्वर येथून आणली. चांगली मशागत करून ऑक्टोबरमध्ये लागवड केली. लागवडीनंतर उत्कृष्टपणे निगा राखून विषमुक्त व चवीला अत्यंत गोड अशा स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याची किमयाही सीमा जाधव यांनी लिलया करून दाखवली आहे. त्यांच्या यशस्वी शेतीचे परिसरातील शेतकरी कौतुक करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT