पुणे

पुणे : उपनिबंधक संवर्गातील 18 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शासनाने सहकार विभागातील उपनिबंधक गट-अ या संवर्गातील 18 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा उपनिबंधकपदी (ग्रामीण) कोल्हापूर शहर येथील उपनिबंधक प्रकाश लक्ष्मण जगताप यांची बदली झाली आहे. तर तेथील कार्यरत उपनिबंधक मिलिंद सोबले यांची सहकार आयुक्तालयातील रिक्त असलेल्या उपनिबंधक पदी बदली करण्यात आली आहे. पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक मधुकांत गरड यांची रिक्त असलेल्या पणन संचालनालयातील उपसंचालक (पणन) या पदावर बदली झाली आहे. तर सहकार आयुक्तालयातील उपनिबंधक आर.एस. धोंडकर यांची गरड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा प्रशासकपदी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

सहकार आयुक्तालयातील उपनिबंधक निळकंठ करे यांची उपनिबंधक अमर शिंदे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या कोल्हापूर जिल्हा उपनिबंधकपदी बदली झाली आहे. औरंगाबाद येथील विभागीय उपनिबंधक (दुग्ध) कार्यालयातील अनिलकुमार दाबशेडे यांची रिक्त असलेल्या गोंदिया जिल्हा उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे. नाशिक येथील आदिवासी विकास संस्थेचे उपनिबंधक किरण गायकवाड यांची सोलापूर जिल्हा उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे. तर तेथील उपनिबंधक कुंदन भोळे यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक पदी बदली करण्यात आली आहे.

पणन संचालनालयातील उपसंचालक (पणन) नितीन काळे यांची मुंबई शहर-1 च्या जिल्हा उपनिबंधकपदी तर तेथील उपनिबंधक जे.डी. पाटील यांची मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपनिबंधक-उपसचिवपदी बदलीचे आदेश शासनाच्या सहकार विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी जारी केले आहेत.

कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांची वसई येथे उपनिबंधक पदी बदली करण्यात आली असून तेथील योगेश देसाई यांची मुंबई येथे मत्स्य उपनिबंधक येथे बदली झाली आहे. तेथील उपनिबंधक शिरीष सकपाळ यांची मुंबई उपनिबंधक (एन विभाग) येथे बदली झाली आहे. मुंबई येथील उपनिबंधक (एम विभाग) डी.आर. डोंगरे यांची बृहन्मुंबई सहकारी नागरी बँक असोसिएशन येथे आणि तेथील उपनिबंधक एस.यु. बनसोडे यांची डोंगरे यांच्या जागी बदली करण्यात आली आहे.

नगर तालुका उपनिबंधक (जि.अहमदनगर) किशन रत्नाळे यांची गडचिरोली येथे रिक्त असलेल्या जिल्हा उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांची रिक्त असलेल्या औरंगाबाद जिल्हा उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे. हातकणंगले (जि.कोल्हापूर) येथील उपनिबंधक प्रगती बागल यांची रिक्त असलेल्या सोलापूर शहर उपनिबंधक पदी बदली करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT