दिवे; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील दिवे येथील राष्ट्रीय बाजाराला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. मोजणी अधिकारी आणि दिवे ग्रामस्थांमध्ये शनिवारी (दि. 3) चांगलीच'तू-तू-मैं-मैं' पाहायला मिळाली. ग्रामस्थांना विश्वासात न घेता राष्ट्रीय बाजार प्रकल्प इथे का आणला? मोजणी का ठेवली? नोटिसा का काढल्या नाहीत, असे प्रश्न विचारून ग्रामस्थांनी बराच काळ मोजणी रखडून ठेवली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिलेल्या या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.
दिवे (ता. पुरंदर) येथील राष्ट्रीय बाजार प्रकल्पाने वेग घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शनिवारी त्याची मोजणी करून जागा निश्चिती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. बाजार समितीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, मोजणी अधिकारी आणि पोलीस आदींचा फौजफाटा मोजणीसाठी गायरान जागेवर येताच स्थानिक नागरिकांनी विरोध केला.
अडथळा आणल्यास कारवाई करण्याचा इशारा या वेळी संबंधितांना पोलिसांनी दिला. मोजणी विभागाने ग्रामपंचायतीला, तसेच स्थानिकांना विश्वासात घेतले नाही, त्यामुळे आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा या वेळी नागरिकांनी घेतला. अखेर ग्रामस्थांच्या लेखी हरकती स्वीकारून त्यावर मोजणी विभागाने आपला अभिप्राय दिल्यावर मोजणीचे काम सुरू करण्यात आले.
भूमी अभिलेख विभागाने ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची लेखी नोटीस दिली नाही. ही मोजणी अनधिकृत असल्याने आमचा याला विरोध आहे. या वेळी सुमारे 50 शेतकर्यांनी मोजणी मंजूर नसल्याबद्दल अर्ज दाखल केले. जवळपास 200 शेतकरी या प्रकल्पाच्या बाजूला आहेत, त्यांनाही नोटीस पाठवायला पाहिजे होती. याअगोदर ग्रामपंचायतीने माजी सैनिक, तसेच निराधारांना राहण्यासाठी जागा मागितली असताना, त्या अर्जाकडे डोळेझाक करून ही नवीन मोजणी आणली असल्याने आमचा विरोध आहे.
– गुलाब झेंडे, सरपंच, दिवे