पुणे

पुणे : मुबलक पाणी असलेल्या भागात मीटरला विरोध

अमृता चौगुले

हिरा सरवदे

पुणे : पाण्याची टंचाई असलेल्या उपनगरांमध्ये समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु, ज्या भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होतो, त्या भागात मात्र मीटर बसविण्यास विरोध होत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. शहरातील नागरिकांना समान व चांगल्या दाबाने पाणीपुरवठा व्हावा तसेच सध्या होत असेलेली 40 टक्के पाणीगळती थांबावी, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे.

ही योजना पुढील 30 वर्षांची संभाव्य लोकसंख्या 49 लाख 21 हजार 663 असेल, असे विचारात घेऊन आखण्यात आली आहे. योजनेसाठी अंदाजे 2 हजार 818 कोटी 46 लाख रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी 82 पाणी साठवण टाक्या, 1550 किमी लांबीच्या लहान-मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या, 120 किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या आणि 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटर बसवणे आदी कामे केली जाणार आहेत. भूसंपादनामुळे 11 टाक्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आत्तापर्यंत 696.76 किमी लांबीच्या वितरण जलवाहिन्या, 63 किमी टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या वाहिन्या टाकण्याचे काम झाले आहे. तसेच 43 पाणी साठवण टाक्यांची कामे पूर्ण झाली असून, 28 टाक्यांची कामे सुरू आहेत. तर भूसंपादनाअभावी 11 टाक्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 3 लाख 18 हजार 847 पैकी 99 हजार 507 पाणी मीटर बसविण्यात आले आहेत.

मुबलक पाणी मिळणार्‍या शहरातील पश्चिम भागातील पेठा, सहकारनगर, बिबवेवाडी, गुलटेकडी, मार्केट यार्ड, कोथरूड, शिवाजीनगर आदी भागांमध्ये पाणी मीटर बसविण्यास नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून सातत्याने विरोध होत आहे. हा विरोध पाण्याची चोरी पकडली जाईल, या भीतीपोटी केला जात असल्याने पाणी असलेल्या भागात पाणी मीटर बसविण्यात आले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मुबलक पाणी मिळत असलेल्या परिसरात पंधरा मिनिटे जरी लवकर पाणी बंद केले, तरी ओरडाओरड केली जाते. तसेच, काही भागांत तर चोवीस तास पाणी असल्याची कबुलीही अधिकार्‍यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक चिपच्या तुटवड्यामुळे काम ठप्प
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी मीटर बसविताना प्रशासनाला नागरिकांच्या आणि राजकीय मंडळींना विरोधाचा सामना करावा लागतो. अशातच आता इलेक्ट्रॉनिक चिपच्या तुटवड्यामुळे पाणी मीटर बसविण्याचे काम ठप्प झाले आहे. महापालिकेने 'इलेक्ट्रो मॅग्नेटिक' पाणी मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. या मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप आहे. त्यामुळे मीटरचे रीडिंग घेण्यापासून मीटर सुस्थितीत आहे की नाही, हे कळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT