पुणे

सोमेश्वरनगर : पोलिस खात्यात मिळालेल्या संधीचे सोने करा

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी पोलिस भरतीत मिळवलेले यश उत्तुंग असते. पोलिस सेवेमध्ये नव्याने रुजू होणार्‍या तरुणांनी पोलिस दलात नोकरी करताना स्वतःमध्ये बदल करावा. अघळ-पघळ राहून चालणार नाही. तुमच्याकडे येणारे नागरिक अपेक्षेने येणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे तुमचे काम असून, माणूस अडचणीत आल्यावर दोनच ठिकाणी जातो.

एक म्हणजे मंदिर आणि दुसरे पोलिस ठाणे. त्यामुळे तुम्हाला समाजातील अडचणीत असणार्‍या लोकांची मदत करण्याची संधी मिळाली असून, मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले. सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिकेचे 40 विद्यार्थी पोलिस दलात भरती झाले आहेत. त्यांचा सत्कार भोईटे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 23) करण्यात आला. त्या वेळी भोईटे बोलत होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक राजवर्धन शिंदे, उद्योजक आर. एन. शिंदे, मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, शिक्षक नेते केशवराव जाधव, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल भोसले, दिग्विजय जगताप, अ‍ॅड. नवनाथ भोसले, सरपंच हेमंत गायकवाड उपस्थित होते.

भोईटे म्हणाले, आई-वडिलांची मान खाली जाईल, असे वागू नका. नोकरी करत असताना तुमच्या शरीराकडे विशेष लक्ष द्यावे. पोलिस दलामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. तुमची वर्तवणूक जपा, व्यसन करू नका, कोणत्याही चांगल्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा, असा सल्ला भोईटे यांनी दिला. प्रास्ताविक विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक गणेश सावंत यांनी केले. तर सूत्रसंचालन चेतन भोसले यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT