बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: बेल्हे, औरंगपूर, साळवाडी, 14 नंबर परिसरातील ताडी विक्री दुकानांतून खुलेआम बनावट ताडीची विक्री केली जात आहे. बनावट ताडी पिल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बेल्हे, औरंगपूर, साळवाडी, 14 नंबर ही गावे हळूहळू अवैध व्यवसायाचे केंद्रबिंदू बनत आहेत. परिसरात वेगवेगळे अवैध व्यवसाय जोरदार सुरू आहेत. राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना परिसरात मात्र दररोज लाखो रुपयांचा गुटखा विकला जात आहे. परिसरात अवैध दारूची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे.
या व्यवसायांबरोबरच आता या गावांमध्ये बनावट ताडीची विक्री सुरू झाली आहे. येथे वेगवेगळ्या ठिकाणी ताडी विक्रीची दुकाने आहेत. यातील दुकानांमध्ये बनावट ताडीची विक्री केली जात आहे. या दुकानांमध्ये दररोज अनेक नागरिक ताडी पिण्यासाठी येतात. गेल्या काही महिन्यांपासून ताडी पिणार्यांना वेगवेगळ्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
हा त्रास सुरू झाल्याने काही नागरिकांनी माहिती घेतली असता ही मूळ ताडी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशिष्ट रसायन, साखर व इतर पदार्थ टाकून बनावट ताडी बनवली जाते. आरोग्याला अतिशय घातक असलेल्या या रसायनामुळे अनेकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. असे असतानाही संबंधित खात्याच्या अधिकार्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
उत्पादन शुल्क विभागाला मिळतोय मलिदा?
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना सर्व माहिती असतानाही बनावट ताडी विक्री करणार्यांना पाठीशी का घातले जाते, हा प्रश्नच आहे. बनावट ताडी विक्रेत्यांकडून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना मोठा मलिदा तर मिळत नाही ना? अशी चर्चा होत आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व अन्न भेसळ अधिकारी यांच्याकडून या बनावट ताडी विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.