सुवर्णा चव्हाण
पुणे: कोणाला स्वतः रचलेली कविता सादर करायची आहे, तर कोणाला मनातील भावना गझलेतून मांडायच्या आहेत. अशा नवोदित कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी मिळणारे खुले व्यासपीठ म्हणजे 'ओपन माईक'. येथे ना मोठ्या रंगमंचाची गरज, ना प्रसिद्धीची अट! केवळ काही मिनिटांचा वेळ आणि समोर मोजके प्रेक्षक. याच प्रेक्षकांसमोर तरुणाई आपल्या कलागुणांना वाट करून देत आहे अन् त्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांची दादही मिळत आहे. पुण्यात ओपन माईक कार्यक्रमांचा ट्रेंड झपाट्याने वाढत असून, तरुण-तरुणी या खुल्या व्यासपीठावर येऊन आत्मविश्वासाने कला सादरीकरण करीत आहेत. शहरातील ३५ ते ४५ कॅफे आणि स्टुडिओमध्ये महिन्याला अंदाजे १०० कार्यक्रम होत आहेत. विशेष म्हणजे, तरुणांचे ग्रुप तरुणांसाठी असे कार्यक्रम आयोजित करीत आहेत.
पूर्वी कविता, गझल किंवा स्टँडअप सादर करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमांची अथवा आयोजकांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करावी लागत असे. आता मात्र ओपन माईकसाठी ऑनलाइन नोंदणी करून पाच ते वीस मिनिटांचा वेळ मिळविता येतो. या वेळेत सहभागी आपल्या आवडीचा कलाप्रकार सादर करतात. साधारण ४० ते ५० प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी व्यावसायिक कलाकार असण्याची अट नसते. आज पुण्यात ओपन माईक कार्यक्रमांची संख्या वाढत असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींपर्यंत २० ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी यात सहभागी होत आहेत.
कविता, प्रेमकविता, गझल, स्टँडअप कॉमेडी, कथाकथन, संगीत, नृत्य, वाद्यवादन आणि प्रेरणादायी विचार, अशा विविध प्रकारांना येथे संधी मिळत आहे. आई, मातीचा गंध, इतिहास, सामाजिक प्रश्न, देशभक्ती आणि वीररस अशा विषयांवरही सादरीकरण केले जात आहे. कोथरूड, कर्वे रस्ता, डेक्कन, बाणेर, बावधन, खराडी आणि विमाननगर परिसरातील कॅफेंमध्ये असे कार्यक्रम होत आहेत. कॅफेमधील स्वतंत्र जागेत छोटा रंगमंच, माईक, ध्वनियंत्रणा आणि प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था केली जाते. प्रत्येक जण या व्यासपीठांवर येऊन दहा ते पंधरा मिनिटांत आपल्या कलेचे सादरीकरण करतात आणि अगदी मोकळ्यापणाने. प्रत्येकाला कला सादरीकरणाची संधी मिळावी, हा यामागील उद्देश असतो.
द बॉक्स हबचे (कला संकुल) संचालक प्रदीप वैद्य म्हणाले, "तरुणांना व्यक्त व्हायचे असते; मात्र प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळतेच असे नाही. प्रत्यक्ष लोकांसमोर बोलणे, कविता सादर करणे किंवा स्वतःचे विचार मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठाची गरज असते. ओपन माईकमधून ती पूर्ण होत आहे. आम्हीही एका कॅफेमध्ये यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील विविध भागांतील कॅफेंमध्ये असे कार्यक्रम होत असून, तरुणांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे."
उत्स्फूर्त प्रतिसाद...
सहभागी तरुण-तरुणी ऑनलाइन नोंदणी करून ठरलेल्या वेळेत आपली कला सादर करतात. प्रेमकविता, गझल आणि स्टँडअप कॉमेडी लोकप्रिय असले; तरी आता वीररस, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक विषयांवरील कवितांनाही संधी दिली जात आहे. आम्ही वीररस आणि देशभक्तीवर आधारित कवितांसाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करतो. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक सहभागीला साधारण १० ते १२ मिनिटांचा वेळ दिला जातो. ओपन माईक कार्यक्रमांचा ट्रेंड पुण्यात वाढत आहे. सादरीकरणाचे व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करून अनेक तरुण आपला आशय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवत आहेत, असे ओपन माईक आयोजित करणाऱ्या राष्ट्रवेध ग्रुपचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.