पुणे

पुणे :नवले हॉस्पिटलसमोर ड्रेनेज चेंबर उघड्यावर

अमृता चौगुले

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नर्‍हे येथील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्यावर ड्रेनेज चेंबरचे झाकण फुटले आहे. रस्त्याच्या मधोमधच हे उघडे चेंबर असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या उघड्या चेंबरमुळे अनेक दुचाकी घसरल्याने अपघात झाले आहेत. येथे प्रसिद्ध असे मोठे रुग्णालय असल्यामुळे महाराष्ट्रातून रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच याच ठिकाणी वैदयकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे येणार्‍या नागरिक, विद्यार्थी, कामगार व रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

मुख्य प्रवेशद्वारासमोरच हे धोकादायक उघडे चेंबर झाल्यामुळे रुग्णवाहिकांना मोठी अडचण झाली आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे एका बाजूनेदेखील रुग्णवाहिका येथून पुढे जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांना येथेच अडकून पडावे लागत आहे.
औषधांच्या दुकानासमोरच हे उघडे धोकादायक चेंबर असल्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहने व रुग्णवाहिका यांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना औषधे घेण्यासाठी येताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे एका मेडिकल दुकानदाराने सांगितले.

रस्त्याच्या मधोमध असलेल्या या उघड्या चेंबरमुळे रुग्णांना वेळेवर उपचारासाठी येथून रुग्णालयात दाखल करणे अवघड व कसरतीचे होत आहे. धोका पत्करूनच रुग्णवाहिका येथून हळूहळू घेऊन जावी लागत आहे. यामुळे तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णांना नेताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
– प्रसाद जांभुळकर, रुग्णवाहिकाचालक

SCROLL FOR NEXT