Health Department | आता आरोग्य अधिकाऱ्यांनाही ‘ओपीडी बंधनकारक’ 
पुणे

Health Department | आता आरोग्य अधिकाऱ्यांनाही ‘ओपीडी बंधनकारक’

सरकारच्‍या ३ संस्थांमध्ये बाह्यरुग्णांची तपासणी करावी लागणार; ऑनलाईन अहवाल पाठवावा, अन्यथा कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आरोग्य यंत्रणेतील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता आठवड्यातून तीन तास बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची तपासणी करावी. प्रत्यक्ष रुग्णसेवेत सहभाग घ्यावा, अशा प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाकडून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ओपीडीत काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतकेच नाही, तर संबंधितांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या किंवा नाही, याची ऑनलाईन नोंद करून संबंधित ठिकाणी आढळलेल्या त्रुटी, दिलेल्या सूचना, संबंधित जबाबदार अधिकारी आणि त्रुटी दूर करण्याची कालमर्यादा नमूद करून प्रत्येक आठवड्यात एक अहवाल तयार करून आरोग्य सेवा आयुक्तालयाला सादर करावा लागणार आहे.

सरकारी आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध पुरेसे मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर होणे गरजेचे आहे. रुग्णांना आवश्यक सेवा प्रत्यक्ष मिळतात किंवा नाही, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. तसेच वरिष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा थेट लाभ गरजू रुग्णांना मिळावा, म्हणून प्रत्यक्ष क्षेत्रभेट आणि ओपीडीबाबत आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर पत्रकाद्वारे निर्देश दिले.

या अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटींमध्ये रुग्णसेवा, ओपीडी, औषधसाठा, लसी, वैद्यकीय साहित्य, निदान सुविधा, मनुष्यबळ आणि रुग्णालयातील दैनंदिन कामकाजाची पाहणी करावी. त्रुटी आढळल्यास तातडीने कार्यवाही करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी साप्ताहिक आढावा घेऊन गंभीर बाबींची माहिती आरोग्य सेवा आयुक्तालयाला सादर करावी लागणार आहे. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही पत्रकातून देण्यात आला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांसाठी नियमावली

तीन आरोग्य संस्थांमध्ये आठवड्यातून किमान तीन तास ओपीडी.

नियमित क्षेत्रीय आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी.

रुग्णसेवा, ओपीडी आणि दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी.

औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य व निदान सुविधांची तपासणी.

स्वच्छता, पाणी, वीज, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालय आणि व्यवस्थापन.

आपत्कालीन, रुग्णवाहिका, रेफरल, प्रसूती व प्रयोगशाळा सेवा.

रुग्ण, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT