पुणे

पिंपरी : पर्यावरण अभ्यासाची केवळ औपचारिकताच; महाविद्यालयीन स्तरावर विषयाबाबत गांभीर्याचा अभाव

अमृता चौगुले

दीपेश सुराणा

पिंपरी : महाविद्यालयीनस्तरावर पर्यावरण विषयक अभ्यासाबाबत अन्याय होत असल्याची बाब पुढे आली आहे. या विषयासाठी कमी तासिका; तसेच या विषयाच्या शिक्षकांना मिळणारा कमी पगार आणि त्याच बरोबरीने या विषयाबाबत गांभीर्याचा अभाव आहे. त्यामुळे हा विषय केवळ औपचारिकता म्हणून शिकविला जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. वृक्षतोड बेसुमार वाढली असून, पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत समाजात पर्यावरण संवर्धनाविषयी जागरुकता असणे गरजेचे आहे. नवीन पिढी पर्यावरणाविषयी जागरुक आणि संवेदनशील बनविण्यासाठी पर्यावरण अभ्यासक्रमाची निकड आणि गरज मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2004-05 पासून वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांमध्ये विद्यार्थ्यांना 'पर्यावरण अभ्यास' हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. हा विषय वेगवेगळ्या महाविद्यालयांत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय वर्षात शिकविला जात आहे.

पुण्यातील नेमकी स्थिती काय?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षणात पर्यावरण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षकांच्या पदाची निर्मिती केलेली नाही. अनुदानित महाविद्यालयांमध्ये पर्यावरणाचा अभ्यासक्रम शिकविणार्‍या शिक्षकांना तासिका तत्त्वावर मानधन दिले जाते. तर, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन ठरविते त्यानुसार, शिक्षकांना दरमहा वेतन देण्यात येते. हा अभ्यास पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात शिकविण्यासाठी प्रत्येकी 60 मिनिटांचे 42 घड्याळी तास तर, प्रत्येकी 60 मिनिटांचे 8 तास हे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी दिले जातात. छोट्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिसंख्या कमी असलेल्या ठिकाणी अन्य विषय शिक्षकच पर्यावरण अभ्यासक्रम शिकवितात.

कोल्हापूरमधील परिस्थिती
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत पर्यावरण अभ्यासक्रम हा पदवी शिक्षणाच्या द्वितीय वर्षात शिकविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमात़ वर्षभराच्या कालावधीत 50 तास हे शिकविण्यासाठी दिले जातात. तर, 10 तास हे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी देण्यात येतात. या विषयासाठी आठवड्याला सध्या दोन तासिका दिल्या जात आहेत. या विषयासाठी तासिका तत्त्वावर शिक्षकांना मानधन दिले जाते. प्रत्येक तासाला 100 रुपये याप्रमाणे शिक्षकांना केवळ 6 हजार रुपये इतके अत्यल्प मानधन मिळते.

विषयाचे सखोल अध्ययन गरजेचे

पर्यावरणात होणारे बदल आणि वाढत्या प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा आघात पाहता पर्यावरणविषयक अभ्यासाचे महत्त्व वाढले आहे. या अभ्यासक्रमाबाबतच्या धोरणामध्ये गांभीर्याचा अभाव आहे. या विषयाचे सखोल अध्ययन होणे अपेक्षित असताना केवळ औपचारिकता म्हणून हा विषय सध्या शिकविला जात आहे.

पर्यावरणविषयक अभ्यासक्रमाला योग्य न्याय देणे गरजेचे आहे. या विषयासाठी पुरेशा तासिका द्यायला हव्यात; तसेच, या विषयाच्या शिक्षकांनादेखील पुरेसे वेतन देणे गरजेचे आहे. सध्या तासिका तत्त्वावर दिले जाणारे मानधन खूपच अत्यल्प आहे.

                                                           – माणिक पाटील, प्राध्यापक,
                                      देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.

पर्यावरण अभ्यासक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ पदाचा अभाव पाहण्यास मिळतो. अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर तर, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन ठरवेल त्यानुसार पगार दिला जातो. हा विषय सध्या औपचारिकता म्हणून शिकविला जात आहे.

                                                      – चंद्रशेखर पवार, प्राध्यापक,
                                             इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, ताथवडे.

पर्यावरण विषयासाठी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये या विषयासाठी अनुदान नसणे, तज्ज्ञ शिक्षण नेमण्याऐवजी इतर विषयांच्या शिक्षकाला शिकविण्यासाठी देणे, गुणपत्रिकेत गुण नमूद न करता श्रेणी देऊन विषयाचे गांभीर्य कमी केले जात आहे.
                                                     – डॉ. बापूसाहेब भोसले,
                                                 पर्यावरण शास्त्र अभ्यासक.

शिक्षणामध्ये सध्या पर्यावरण विषयाची हेळसांड सुरू आहे. या विषयाला गुणाऐवजी श्रेणी असल्याने या विषयाकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे. सध्या जाणवणार्‍या पर्यावरणविषयक समस्या समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण गरजेचे आहे.

                                  – डॉ. अमोल लाटे, सहाय्यक प्राध्यापक, लातूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT