पुणे

बूस्टर डोस घेणारे ९ टक्केच; लसीकरणात महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर

अमृता चौगुले

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : राज्यात आतापर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील 50 लाख 96 हजार 256 नागरिकांनी, तर 30 लाख 92 हजार 905 ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत बूस्टर डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ नऊ टक्के इतके आहे. पहिला डोस घेतलेल्या 83 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. बूस्टर लसीकरणात महाराष्ट्र देशात नवव्या
क्रमांकावर आहे.

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून देशभरात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, दुसर्‍या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले रुग्ण, त्यानंतर 18 ते 59 वर्षे वयोगट, 15 ते 17 वर्षे वयोगट आणि सर्वांत शेवटी 12 ते 14 वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले.

पहिला आणि दुसरा डोस कोव्हिशिल्ड लसीचा घेतला असल्यास तिसरा डोस कोव्हिशिल्ड किंवा कॉर्बेव्हॅक्स लसीचा घ्यावा, अशा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. लसीचा पहिला आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेतला असल्यास तिसरा डोस कोव्हॅक्सिन किंवा कॉर्बेव्हॅक्सचा घेता येऊ शकतो. गेले तीन महिने अनेक महापालिकांकडे कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नसल्याने बूस्टर लसीकरणावर परिणाम झाला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून लस उपलब्ध झाल्या आहेत.

सध्या कॉर्बेव्हॅक्स लसीचा तुटवडा असल्याने 12 ते 14 वर्षे वयोगटाचे लसीकरण अनेक ठिकाणी बंद आहे. राज्यात 15 ते 59 या वयोगटांत पहिल्या डोसचे सर्वाधिक लसीकरण मुंबईत झाले. सुमारे 89 लाख 69 हजार 285 मुंबईकरांनी डोस घेतला आहे. त्यानंतर पुणे आणि अहमदनगरमध्ये जास्त लसीकरण झाले आहे. मुंबईत दुसरा डोस आणि बूस्टर डोस घेणार्‍यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक लसीकरणही मुंबईमध्ये झाले आहे.

पहिला डोस घेण्यात पुणेकर अव्वल
पुणे जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटांतील 2 लाख 28 हजार 570 जणांनी सर्वाधिक पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर नाशिकमध्ये 2 लाख 13 हजार 105 जणांनी आणि मुंबईमध्ये 1 लाख 96 हजार 992 जणांनी पहिला डोस घेतला आहे. याच वयोगटात दुसरा डोस घेणार्‍यांचे सर्वाधिक प्रमाण नाशिक, त्यानंतर पुणे आणि मुंबईमध्ये आहे.

वयोगट पहिला डोस दुसरा डोस बूस्टर डोस
आरोग्य कर्मचारी 12 लाख 95 हजार 798 11 लाख 96 हजार 204 5 लाख 33 हजार 536
अत्यावश्यक कर्मचारी 1 लाख 50 हजार 398 20 लाख 12 हजार 519 8 लाख 37 हजार 187
12 ते 14 28 लाख 90 हजार 439 18 लाख 69 हजार 178 उपलब्ध नाही
15 ते 59 7 कोटी 19 लाख 27 हजार 283 5 कोटी 99 लाख 32 हजार 505 50 लाख 96 हजार 256
60 वरील 1,33,96,110 1,15,77,558 30,92,905

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT