Illegal Online medicine  (Pudhari File Photo)
पुणे

Online Medicine: ऑनलाइन औषधविक्रीवर बंदी घाला, HM अमित शहांकडे पत्राद्वारे मागणी कोणी केली?

Illegal Online Drug Sale | औषधांची बेकायदेशीर ऑनलाइन विक्री वेगाने वाढत असून त्याचा गंभीर दुष्परिणाम रुग्णांना भोगावा लागू शकतो.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : औषधांची बेकायदेशीर ऑनलाइन विक्री वेगाने वाढत असून त्याचा गंभीर दुष्परिणाम रुग्णांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करून काही मिनिटांत औषध घरपोच देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी औषध विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे. पुणे केमिस्ट असोसिएशनसह राज्यातील विक्रेत्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

ऑनलाइन औषध विक्रीसाठी कोणताही परवाना देण्याची तरतूद नाही, तरीही काही कंपन्या खुलेआम नियमबाह्य पद्धतीने औषधे विक्री करत आहेत. गुणवत्तेची खात्री न देता अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जातात. औषधे योग्य तापमानात साठवली जातात का, त्यांचा पुरवठा कुठून होतो याबाबत शंका उपस्थित होत आहे. गर्भपाताच्या गोळ्या, व्यसन लावणारी औषधे यांचीही ऑनलाइन विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व सचिव राजीव सिंघल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देऊन ई-फार्मसी व्यवसायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याचे हे सर्रास उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक औषधे फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच दिली जाणे अपेक्षित आहे. परंतु, ऑनलाइन विक्रीत कोणतीही पडताळणी यंत्रणा नसल्याने बेकायदा पुरवठा वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

औषध विक्री ही कायद्याने फक्त परवानाधारक फार्मासिस्टच्या देखरेखीखाली होणे बंधनकारक आहे. ऑनलाइन व्यवसायामुळे चुकीचे औषध रुग्णांपर्यंत पोहोचल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. राज्यात तब्बल 4 लाख 72 हजार औषध विक्रेते नियम पाळून सेवा देत आहेत. मात्र ऑनलाइन विक्रीत हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे समाजाच्या हितासाठी अशा कंपन्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बेलकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT