पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात अवकाळी पावसात शेतकर्यांनी काढणी केलेले कांदे भिजले. शेतकर्यांनी इतर कांदे बराकीमध्ये साठवले. परंतु आता सततच्या पडणार्या अवकाळी पावसामुळे बराकीत साठवलेले कांदे आता सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात गेली दीड महिन्यापासून कांदा काढण्याची कामे सुरू आहेत.
मागील आठवड्यापासून या परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ऐन कांदा काढण्याची कामे सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे कांदे भिजले. भिजलेले कांदे शेतकर्यांनी तसेच बराकींमध्ये साठवले. हे साठवलेले कांदे आता सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गतवर्षी देखील अवकाळी पावसाने कांदा काढणी सुरू असताना हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे कांदे पावसाने भिजले होते. ते बराकीत साठविल्यानंतर एक महिन्याच्या आतच ते सडू लागले, यंदा तीच पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे.