पुणे

बारामती : किरकोळ विक्रीला कांदा अजूनही 20 रुपयांवर; फक्त शेतकर्‍यांनाच कवडीमोल दर

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ बाजारात ग्राहकांना कांदा 20 रुपये किलोने घ्यावा लागत आहे. एकीकडे राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना किरकोळ विक्रीचे दर मात्र चढेच असल्याचे दिसून येते. यात शेतकर्‍यांचे मरण होत आहे तर मध्यस्थ मालामाल होत आहेत. सध्या कवडीमोल भावाने बाजार समित्यांमध्ये कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. अनेक शेतकरी कांदा विक्रीच्या पावत्या सोशल मीडियावर टाकून याबाबत संताप व्यक्त करीत आहेत. कांदा विक्रीच्या रकमेतून झालेला खर्च, काढणी, काटणी, गोणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे कांद्याची किरकोळ विक्री 20 रुपये किलोने होत आहे. तीन किलो किंवा त्यापेक्षा अधिक कांदा घेतला तर भाव थोडा कमी केला जातो.

एकीकडे शेतकर्‍यांच्या कांद्याला 2 ते 5 रुपये किलो असा भाव व्यापार्‍यांकडे मिळत असताना किरकोळ विक्रेते मात्र 20 रुपयाने कांदा विकत असल्याची स्थिती आहे. शेतमाल विक्रीत अजूनही दलाल मालामाल होत असल्याची ओरड विविध शेतकरी संघटना व शेतकर्‍यांकडून नेहमीच केली जाते. त्याचा प्रत्यय सध्याच्या स्थितीत येत आहे. सध्या कांद्यासह अन्य शेतमालाचे भाव कोसळले आहेत. मेथी, कोथिंबीर कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. त्यातून शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात हमखास उत्पन्न मिळवून देणारी काकडी, टरबूज आणि कलिंगडसुद्धा अत्यंत स्वस्तात विकावी लागत असल्याने शेती तोट्यात गेली आहे.

SCROLL FOR NEXT