पुणे

कांदाप्रश्नी राजगुरुनगरला ‘रास्ता रोको’

अमृता चौगुले

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने चाळीस टक्के शुल्क लावल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राजगुरुनगर येथे रविवारी (दि. 27) 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. राजगुरुनगर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसस्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आले. 'रास्ता रोको'दरम्यान आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात आली. मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.

जवळपास अर्धा तास आंदोलन सुरू होते. पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरून बाजूला होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. खेड पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी त्यांना समज देऊन सोडून दिले.

राज्य युवक काँगेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, युवक जिल्हाध्यक्ष महेश टापरे, प्रभारी उदय माजी सभापती सतीश राक्षे, खेड तालुका युवक अध्यक्ष अमोल दौंडकर, वंदना सातपुते, किसान सेल तालुकाध्यक्ष सुभाष होले, सुनील मिंडे, जिल्हा महिला लीगल सेल अध्यक्षा जया मोरे, अ‍ॅड. गणेश सहाणे, उमेश रानवडे, दीपक राठोड, राजेश वाघोले, प्रधान सचिव पृथ्वीक घनवट आदी या वेळी उपस्थित होते. आंदोलन सुरू असताना महामार्गावरील वाहतूक एसटी बस स्थानक आवारातून सुरु ठेवण्यात आली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT