पुणे

लोणी- धामणी : कांद्याचे दर कोमात, तरीही लागवड जोमात..!

अमृता चौगुले

लोणी- धामणी; पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे भाव कोमात गेलेले असतानाही शेतकारी मात्र नव्या आशेने पुन्हा जोरदार कांदा लगवडी करत आहेत. आंबेगाव तालुक्यात पूर्व भागात रब्बी कांदा लागवडींना सुरुवात झाली आहे. मागील हंगामात अनेक कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याचा भाव भविष्यात वाढेल या उद्देशाने बराखीतच कांदा साठवून ठेवला आहे, मात्र डिसेंबर महिना सुरू झाला,नवीन कांदा लागवड चालू झाली तरी देखील कांद्याचे भाव वाढत नाहीत. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे, तरीही लागवडी मात्र जोमात सुरू आहेत.

मांदळेवाडी, लोणी, धामणी, वडगावपीर, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, वाळूंजनगर, खडकवाडी, निरगुडसर, काठापूर बुद्रुक, देवगाव या गावांमध्ये रब्बी हंगामातील कांदा लागवडी मोठ्या प्रमाणात करतात. घरगुती रोपांनाच पसंती यंदा बहुतांशी शेतकर्‍यांनी दिलेली दिसत आहे. लागवडीसाठी शेतमजुरांना जोडीला दिवसाची हजेरी सहाशे ते सातशे रुपये द्यावी लागत असल्याचे मांदळेवाडी येथील शेतकरी संभाजी आदक, चेअरमन फकिरा आदक, हनुमंत आदक, ज्ञानेश्वर मांदळे यांनी सांगितले.

सद्यस्थितीत 10 किलोस 120 ते 130 असा प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे. परंतू हा बाजारभाव उत्पादन व साठवणूक खर्च याचा विचार करता अतिशय अल्प आहे. भांडवली खर्च तेव्हाच मिळतो जेव्हा दहा किलोस 250 रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळतो. असा बाजारभाव मिळाला तर किमान भांडवली खर्च जाऊन थोडासा नफा शिल्लक राहू शकतो. दरम्यान शेतकर्‍यांना कांद्याचे भाव लवकरच वाढतील अशी आशा आहे. बराखीतील कांदा जर लवकर विकला नाही तर सडून खराब होणार व कमी बाजारभावात कांदा विकला गेला तरी नुकसानच होणार. त्यामुळे शेतकर्‍यांची द्विधामनस्थिती झाली आहे.

उसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. कांद्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे जीवनमानच बदलून गेले आहे. नुकसान असो या फायदा असे म्हणून ही अनेक जण कांद्याची लागवड करतात. रोपात साधले की उत्पादनात साधणारच याची खात्री शेतकर्‍यांना आता पटली आहे. शिवाय लागवडीनंतर 3 महिन्?ात आणि पेरणीनंतर 5 महिन्यात पीक पदरात पडते. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. यंदा पावसामुळे खरिपातील कांदा लागवडीला उशीर झाला आहे.
                                                     – बाबाजी वाळुंज, प्रगतशील शेतकरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT