आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि. 11) झालेल्या कांदा लिलावात भावात मोठी घसरण झाली. प्रति 10 किलोस 145 रुपये कमाल भाव मिळाला असल्याची माहिती सभापती संजय काळे तसेच उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतरही बाजारपेठेत कांदा भावामध्ये घसरण सुरूच आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसून त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. उन्हाळी गावरान नवीन कांदा बाजारपेठेत विक्रीस येऊ लागल्याने त्याचा परिणाम कांदा भावावर होत आहे.
आळेफाटा उपबाजारात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कांदा भाव प्रति 10 किलोस 200 रुपये होता; मात्र त्यानंतर कांदा भाव हळूहळू घसरण्यास सुरवात झाली. आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी झालेल्या लिलावात कमाल कांदा भाव प्रति 10 किलोस 150 रुपयांचे खाली आला. यामुळे विक्रीस आलेले शेतकरी हवालदिल झाले.
दरम्यान कांद्याच्या चांगल्या आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आळेफाटा उपबाजारात कांदा भाव घसरणीचा परिणाम झाला आहे. मागील 15 दिवसांपासून कांदा आवक 10 हजारांचे आत आली आहे. आजही झालेल्या लिलावात 10 हजार 474 गोणी कांदा शेतकरीवर्गाने विक्रीस आणला असल्याची माहिती सचिव रूपेश कवडे तसेच कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.
कांद्यास 10 दहा किलोस मिळालेले भाव (रुपयांमध्ये)
एक्स्ट्रा गोळा : 135 ते 145
सुपर गोळा : 125 ते 130
सुपर मीडियम : 115 ते 125
गोल्टी व गोल्टा : 70 ते 100
बदला व चिंगळी : 40 ते 70