पुणे

ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक धास्तावले

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रविवारी (दि. 17) सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे नवीन लागवडी झालेल्या कांद्यावर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यापासून तालुक्याच्या पूर्वभागात कांदालागवडी वेगात सुरू आहेत. यंदा कांदालागवडीसाठी शेतकर्‍यांना पाणी, मजूर, रोपांची टंचाई अधिकच जाणवली. तरीदेखील शेतकर्‍यांनी कांदालागवडी मोठ्या प्रमाणावर केल्या. परंतु, काही दिवसांपासून वारंवार ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: धास्तावले आहेत. अगाप लागवडी झालेल्या कांदा पिकाच्या पाती दूषित हवामानामुळे पिवळ्या पडून वाकल्या आहेत. रसशोषित किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पातींवर पांढरे ठिपके पडले आहेत. नवीन लागवडी झालेल्या कांद्यावरदेखील या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

रविवारी सकाळपासून या परिसरात ढगाळ वातावरण होते. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी सुरू केली आहे. यंदा कांदालागवडी करणार्‍या मजूर महिलांनीदेखील मजुरीचे दर वाढवले आहेत. आता वारंवार फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.
                                                     अविनाश जाधव, कांदा उत्पादक शेतकरी.

SCROLL FOR NEXT