कांदा उत्पादकांवर सुलतानी संकट; दराअभावी आर्थिक गणित कोलमडले Pudhari
पुणे

Onion Farmers Crisis: कांदा उत्पादकांवर सुलतानी संकट; दराअभावी आर्थिक गणित कोलमडले

पावसाळी हवामानामुळे वखारीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मांडवगण फराटा: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पावसाळी हवामानामुळे वखारीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसर हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले होते. मात्र, बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी कांदा वखारीत साठवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वखारीतील कांदा खराब होऊ लागला आहे. (Latest Pune News)

काही बाजार समित्यांमध्ये तर शेतकऱ्यांना कांदा विकण्यासाठी पैसे मिळण्याऐवजी वाहतूक व हमालीचा खर्च स्वतःकडून भरावा लागत आहे. परिणामी, काही शेतकरी कांदा शेतातच टाकून देत आहेत. हा प्रकार संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.

सध्या कांद्याचे उत्पादन भरपूर असून, मागणी मात्र कमी आहे. त्यामुळे बाजारपेठ कोसळली आहे. सरकारने जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शेतकरी गणेश फराटे इनामदार यांनी सांगितले की, कांद्याला योग्य भाव मिळत नसेल, तर शेतकऱ्यांचा उत्साहच मावळतो. मेहनतीचे चीज व्हावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.

शरदराव गायकवाड यांनी सांगितले की, चांगला भाव मिळेल, या आशेने कांदा लागवड केली होती. मात्र, सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नाही. सरकारने हमीभाव जाहीर केल्यास कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल.

आता तीन-चार महिन्यांनी नवीन कांदा बाजारात येणार आहे. दराअभावी अजून जुना कांदा वखारीत पडून आहे. तो किती सडला आहे, हे वखारी उघडल्यानंतरच समजणार आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन कांदा खरेदीसाठी विशेष योजना राबवाव्यात.
- विजय गायकवाड, शेतकरी, सादलगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT