पुणे

ढगाळ वातावरणामुळे कांदा पीक धोक्यात

अमृता चौगुले
लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेली गारपीट, अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसला. धुके व पाऊस यांपासून कांदा रोपे वाचविण्यासाठी मोठ्या फवारण्या कराव्या लागत असल्याने कांदा उत्पादकांचा खर्च वाढत आहे. धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत.
यंदा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. मात्र, मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास निर्माण होणार्‍या धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादित मालाला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.
सध्या काही ठिकाणी कांद्याचे पीक एक महिन्याचे झाले असून, नवीन कांदा लागवड सुरू आहे. मात्र कांदा पिकासाठी पोषक असे थंडीचे वातावरण गायब होऊन अवकाळी पावसाने कांद्यास चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाच्या उघडिपीनंतर ढगाळ वातावरण व सकाळच्या धुक्याचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत. परिणामी कांदा उत्पादन खर्चात भर पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT