आळेफाटा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (दि. 4) झालेल्या लिलावात उन्हाळी कांद्याची 25 हजार 640 गोणी आवक झाली. उच्चांकी आवक झाल्याने भावात घसरण झाली. कांद्यास प्रतिदहा किलोस 185 कमाल भाव मिळाला अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.(Latest Pune News)
उन्हाळ्यात गावरान कांद्यास कमी भाव मिळत होता. यामुळे बहुतांश शेतकरीवर्गाने कांदा साठवला. अपेक्षित भाव मिळेल अशी आशा शेतकरी बाळगून असताना भावात वाढ न झाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत आले. सध्याच्या भावामुळे शेतकरीवर्ग हवालदिल आहेत. पावसामुळे कांदा सडेल या भितीने शेतकरीवर्ग कांदा विक्रीस आणत आहेत. यामुळे आळेफाटा उपबाजारात ऑगस्ट महिन्यापासून कांदा आवक वाढत आहे.
आळेफाटा उपबाजारात 16 ऑक्टोबरला उच्चांकी अशी 25 हजार गोणी आवक झाली. आजच्या लिलावातही ही आवक उच्चांकीच झाली. दीपावली सणानिमित्त तसेच दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्यास मागणी वाढल्याने 26 सप्टेंबरला झालेल्या लिलावात कांद्यास प्रती दहा किलोस 221 भाव मिळाला. मात्र, त्यानंतर पुन्हा भावात घसरण सुरू झाली. रविवारी झालेल्या लिलावात कांद्यास प्रती दहा किलोस 200 भाव मिळाला. आजच्या लिलावात पुन्हा घसरण झाली.
प्रतवारीनुसार कांद्यास प्रती दहा किलोस 50 ते 185 रूपये भाव मिळाला असल्याची माहिती संचालक नबाजी घाडगे सचिव रूपेश कवडे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.