पुणे: एकतर्फी प्रेमातून पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार केल्यानंतर माथेफिरूने देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हल्ल्यात तरुणीच्या मज्जारज्जू (स्पाईन कॉड) ला गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे.
स्नेहल यशवंत सावंत (वय 28) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी, पालघर पोलिसांनी अमोल सिकंदर मुळे (रा. बीड) याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्नेहल हिचे चुलते आनंदराव सावंत (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे.
तरुणीच्या हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, अमोल हा तिच्यावर लाकडावर जसे घाव घालावेत तसे वार करताना दिसून येतो आहे. त्याच्या हल्ल्यात क्षणांतच स्नेहल खाली कोसळल्याचे दिसून येते. ही घटना 12 जून रोजी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पालघर येथील गोल्ड टॉकीजच्याजवळील रस्त्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल मूळची सातारा जिल्ह्यतील माण तालुक्यात राहणारी आहे, तर आरोपी अमोल मुळे हा बीड जिल्ह्यातील. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एकाच क्लासमध्ये होते. ऑक्टोबर 2025 मध्ये स्नेहलची पालघर येथे महसूल सहायक म्हणून निवड झाली, तर अमोल हायकोर्ट येथे लिपीक म्हणून नोकरीला लागला.
तो स्नेहलवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने स्नेहल हिला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे अमोल तिच्यावर चिडून होता. एक महिन्यापासून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. तो सतत तिच्यासोबत वाद घालत होता. 11 जून रोजी स्नेहल घराकडे पायी निघाली होती. त्यावेळी अमोल याने तिला रस्त्यात गाठले. अडवून तिला तो त्रास देऊ लागला.
स्नेहल त्याला म्हणाली, तू येथून निघून जा, तू जर मला त्रास दिला तर मी पोलिसांत तक्रार करेल. दुसऱ्या दिवशी (दि.12) स्नेहल काम संपल्यानंतर घरी निघाली होती. त्यावेळी सायंकाळचे सव्वासहा वाजले होते. अमोलने पाठलाग करून तिला गाठले. ती बेसावध असतानाच अमोलने तिच्यावर कोयत्याने हल्ला चढविला.
त्यात गंभीर होऊन ती रस्त्यात कोसळली. त्यानंतर अमोल तेथून फरार झाला होता. स्थानिकांनी स्नेहलला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्या मानेवर, मज्जारज्जूला गंभीर दुखापत झाल्याने तिला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. परंतु अद्याप ती शुद्धीवर आलेली नसून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपीने विषारी औषध प्राशन केले
स्नेहल हिच्यावर हल्ला करून पसार झालेला आरोपी अमोल मुळे याने देखील विषारी औषध प्राशन केल्याची माहिती आहे. त्याच्यावर सिल्वासा येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक मल्हार थोरात यांनी सांगितले.