रिंग रोडच्या आखणीत तिसर्‍यांदा बदल करण्यात आले File photo
पुणे

Ring Road : पूर्व हवेलीत रिंग रोडच्या आखणीत आणखी एकदा बदल

पुढारी वृत्तसेवा

पूर्व हवेली तालुक्यातून जाणार्‍या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या(एमएसआरडीसी) रिंग रोडच्या आखणीत तिसर्‍यांदा बदल करण्यात आले आहे. शिंदवणे व वळती गावात रिंगरोडची आखणी बदलल्याने शेतकर्‍यांना भूसंपादनासाठी नोटीस देऊन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाने मंजुरी न दिल्याने एमएसआरडीसीकडून बदल करण्यात आला आहे.

हवेलीतून सोलापूर रस्त्यामार्गे पुरंदर, शिवरीकडे जाणार्‍या टप्प्यात एसएसआरडीसीकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी तिनवेळा या ठिकाणी आखणीत बदल करुन शेतकर्‍यांना नोटीसा देऊन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा या मार्गावर वळती व शिंदवणे या गावांमध्ये आखणीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या नोटीसा पाठवून मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या भागात एमएसआरडीसीकडून रिंगरोडसाठी पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित मार्गासाठी वळती व शिंदवणे या गावांत वर्तुळाकार पध्दतीने महामार्ग एकमेकांना जोडले जाणार होते; मात्र पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला केंद्राकडून मंजुरी न मिळाल्याने ही वर्तुळाकार जोडणीची रचना स्थापत्य विभागाने रद्द केल्याने या मार्गावरील साधारण पाचशे मीटर अंतरावर भूसंपादनात बदल करून अतिरिक्त भूसंपादन करण्यात येणार आहे.

पूर्व हवेलीत या टप्प्यात तिसर्‍यांदा बदल होत असताना भूसंपादन प्रक्रिया, हरकती नोटीसा व मिळकतींचे निवाडे अशा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. आता नव्याने या प्रक्रियेला राबवावे लागणार आहे. शिंदवणे व वळती या भागात एका मोठ्या संस्थेची जमीन व भारत पेट्रोलियमचा डक असल्याने आखणीत बदल करताना मोठा हस्तक्षेप झाला आहे. वळती भागात काही भूसंपादनात बागायती व जिरायती जमीन मूल्यांकनात तफावती आहेत. परत आता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकर्‍यांची मंजूरी असूनही बदलत्या भूसंपादन धोरणाने शेतकरी चिंतेत आहे.

पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित मार्गाची रचना रिंगरोडला वर्तुळाकार पध्दतीने जोडण्याची होती; मात्र पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला मंजुरी मिळत नसल्याने या टप्प्यातील आखणीत बदल झाला आहे. या ठिकाणी रिंगरोडला नव्वद डीग्री प्रमाणात वळण निर्माण होत असल्याने या ठिकाणी अतिरिक्त भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही प्रमाणात बदल असून आवश्यक भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- हनुमंत आरगुंडे, अप्पर जिल्हाधिकारी, एमएसआरडीसी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT