ओतूर: ओतूर ते धोलवड (ता. जुन्नर) रस्त्यावर टेम्पो व दुचाकीस्वार यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अल्पवयीन टेम्पोचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूरच्या दिशेने आलेल्या टेम्पोने (एमएच 12 एसएक्स 6997) रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीला (एमएच 16 एएफ 5245) धडक दिली. या अपघातात किशोर यशवंत कडाळे (रा. वनकुटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Pune News)
तर त्यांच्यासोबत असलेले नामदेव भले आणि संदीप केदार हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ओतूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो पलटी झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेश पटारे, भरत सूर्यवंशी, नामदेव बांबळे, संदीप लांडे, संदीप भोते, श्याम सुंदर जायभाये हे हजर झाले व अपघात स्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली.