खेड-शिवापूर: पुणे-सातारा रस्त्यावर वेळू (ता. भोर) फाट्यावर पुणे बाजूकडून येणार्या ट्रकने दोन दुचाकींसह चार वाहनांना पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले आहेत. राजगड व महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून वाहतूक सुरळीत केली.
प्रवीणकुमार पोतना बंकलवाड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 7) दुपारी एकच्या सुमारास पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे एक ट्रक निघाला होता.
ससेवाडी उड्डाणपुलावरून खाली येताना वेळू फाट्यावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्या वेळी समोर निघालेल्या एका दुचाकीला धडक देऊन दुसर्या दुचाकीला सुद्धा धडक दिली. या दुचाकीवरील चालक पुढील चाकाखाली येऊन जागीच ठार झाला, तर पुढील मारुती कारला धडक देऊन सदर कार पुढच्या टँकरला धडकली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी श्रीयश मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व श्लोक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.