पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत झालेल्या 96 प्राणांतिक अपघातात शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. अपघात झालेल्या दुचाकीस्वारांपैकी अनेकांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. रस्ते अपघातांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असली, तरी अपघातांचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे.
रॅश ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, मानवी चुकांसह अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण, अशी विविध कारणे या अपघातांमागे आहेत. अपघातातील मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
पुणे शहर परिसरात मागील तीन महिन्यांत 96 प्राणांतिक अपघातांमध्ये 100 जणांचा मृत्यू झाला, तर 148 गंभीर अपघातांमध्ये 164 जण गंभीर जखमी झाल्याचे शहर वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. एकंदरीत, शहर परिसरात दिवसाला एका नागरिकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे दिसून येते. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर आणि लोणीकंद या उपनगरांच्या भागात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. या दोन्ही भागांत तीन महिन्यांत 29 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
त्यामुळे लोणी काळभोर भागातून जाणारा सोलापूर रस्ता आणि लोणीकंद भागातून जाणार्या पुणे-नगर रस्त्यावर सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले आहेत. रस्ता क्रॉस करताना पादचार्याचा मृत्यू, रात्रीच्या वेळी झालेले अपघात, भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू, अशा घटना सर्वाधिक आहेत. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून प्राधान्याने उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. तसेच, शहर परिसरात वाहतूक नियमभंग करणार्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
आकडे काय म्हणतात…
प्राणांतिक अपघातांची संख्या – 96
रस्त्यावरील अपघाती मृत्यू – 100
गंभीर अपघातांची संख्या – 148
अपघातात गंभीर जखमी – 164