चाकण : पुढारी वृत्तसेवा : वेगवान वार्याने झाड कोसळून मोटारीचे नुकसान व दुचाकीवरील एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना चाकण (ता. खेड) परिसरात घडल्या. चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी (ता. खेड) व झित्राई मळा (चाकण) येथे या दोन्ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री घडल्या.
खराबवाडी गावातील जय मल्हार हॉटेलसमोर आणि एका कंपनीजवळ दुचाकीवर रस्त्याच्या कडेचे झाड कोसळले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. सुनीलकुमार शिवनाथ पटेल (वय 32, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कामावरून परतत असताना दुचाकीस्वारावर काळाने घाला घातला. याच दुचाकीवरील आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी दाखल झालेले महाळुंगे पोलिस व वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत केली. तपास महाळुंगे पोलिस करीत आहेत.
झित्राई मळा येथे मंगळवारी रात्री घडलेल्या दुसर्या घटनेत चालत्या मोटार कारवर झाड कोसळले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी चाकण पालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर मोटार कारवर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, अनेक ठिकाणचे वृक्ष वठले आहेत. या दोन घटनांनंतर उशिरा शहाणपण सुचलेल्या प्रशासनाने धोकादायक झाडे व फांद्या काढण्याचे काम सुरू केले आहे.