वरकुटे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील ईश्वर ज्ञानदेव डोंगरे यांच्या गट क्रमांक 471 मधील एक एकर उसाला रविवारी (दि. 6) सायंकाळी 6.30 वाजता ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत डोंगरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. डोंगरे यांच्या 471 गटातील उसाला ट्रान्सफॉर्मरमुळे मागील चार वर्षात तीन वेळा आग लागली आहे. या आगीमध्ये प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचे नुकसान डोंगरे यांना सोसावे लागत आहे. डोंगरे यांचे घर जळीत क्षेत्राला लागून असल्यामुळे भविष्यात जीवितहानीचाही धोका संभवू शकतो.
दोन वर्षापासून डोंगरे महावितरण केंद्र, लोणी देवकर येथील अधिकार्यांना या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विनंती करत आहेत. परंतु महावितरणच्या अधिकार्याकडून त्यांना लवकरच करू, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ट्रान्सफॉर्मरमुळे वारंवार होणार्या अग्नी तांडवांना आवर घालत शेतीचे नुकसान व भविष्यातील जीवितहानी टाळावी, यासाठी ट्रान्सफॉर्मर इतरत्र कायमस्वरूपी हलवावे, अशी मागणी डोंगरे यांनी महावितरणच्या अधिकार्यांकडे केली आहे.