पुणे

Diwali 2023 : पुणेकरांचे सहकुटुंब देवदर्शन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिव्यांनी-पणत्यांच्या प्रकाशात उजळलेली मंदिरे…पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब मंदिरात दर्शनासाठी
आलेले पुणेकर…आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर सेल्फी क्लिक करणारी तरुणाई…दिवाळी पहाटमध्ये रमलेले पुणेकर रसिक…असे
चैतन्यपूर्ण वातावरण रविवारी सकाळी रंगले होते.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शहरातील मंदिरे आणि सारसबाग परिसर गर्दीने फुलून गेला होता. त्याशिवाय ग्रामदैवत श्री कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी मंदिरासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबागेतील गणपती मंदिरात आणि महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली आणि सणाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळाला. रविवारी (दि.12) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी साजरे झाले. नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याचा प्रघात आहे. त्यामुळे पहाटे पुणेकरांनी देवदर्शनाला महत्त्व दिले. सारसबागेतील गणपती मंदिरात व सारसबागेत पहाटेपासून मोठी गर्दी झाली.

पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब दर्शनासाठी नागरिक आले होते. तरुण-तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर सणाचा आनंद लुटताना पाहायला मिळाले. तरुणाईने आकाशदिवेही आकाशात सोडले. सारसबागेत यानिमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला. सारसबागेत तरुणाईने मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व सेल्फीही क्लिक केले. सारसबागेचा आसपासचा परिसरही गर्दीने फुलून गेला होता. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, तसेच विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. मंदिरांमध्ये फुलांची सजावट अन् विद्युत रोषणाई केली होती. मंदिरांमध्येही पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी होती. यामुळे भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता.

फटाक्यांची आतषबाजी
नरक चतुर्दशीनिमित्त घरोघरी आनंदी वातावरण होते. देवदर्शन आणि त्यानंतर सहकुटुंबांनी एकत्रित येऊन फराळाचा आणि पंचपक्वानांचा आस्वाद घेतला. त्याशिवाय ठिकठिकाणी लहान मुलांनी फटाक्यांची आतषबाजीही केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT