पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने जी कामे सुरू केली आहेत, त्याला जाणीवपूर्वक विरोध करायची भूमिका विरोधक घेत आहेत. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला स्विकारले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आता महाविकास आघाडीला 440 व्होल्टचा करंट देण्याची गरज आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
चिंचवड पोटनिवडणुकीनिमित्त बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विविध समाजांचे मेळावे घेतले. त्या प्रसंगी पिंपळे गुरव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमुळे महाराष्ट्र हा प्रचंड मागे गेला आहे. आता नवीन डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी भूमिका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतली होती. त्या वेळी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. मात्र, अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीने प्रतिस्पर्धी उमेदवार देऊन अपेक्षाभंग केला. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांची परिस्थिती ही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी', अशी असल्याचे चित्र पाहण्यास मिळत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.