पुणे

सांगवी : निरा डाव्या कालव्याचे आवर्तन लांबणीवर; सांगवीतील पिके जळण्याच्या मार्गावर

अमृता चौगुले

अनिल तावरे

सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. मागील आवर्तनावेळी काही जणांच्या नेतेगिरीमुळे ते बंद करण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातील महत्त्वाचे आवर्तन लांबणीवर गेले असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून समजले. हे आवर्तन लांबणीवर गेल्याने विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी शेतातील उभी पिके जळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निरा डाव्या कालव्याच्या वितरिका क्र. 18 वर सांगवी परिसरातील शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, धुमाळवाडी, मानाजीनगर, भिकोबानगर व पवईमाळ या गावातील शेती अवलंबून आहे.

या वितरिकेला दि. 26 मार्च रोजी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. त्याच दरम्यान माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला होता. बहुतांश शेतकर्‍यांचा ऊस गळीतास तुटून जाण्यास बाकी होते. शेतातील तोडलेला ऊस बाहेर काढताना अडचणी येऊ नयेत म्हणून काही नेत्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणून त्या परिसरातील आवर्तन मागे- पुढे करण्यास भाग पाडले असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे या वितरिकेचे आवर्तन बंद करण्यास काही दिवस उशीर झाला.

आता दोन महिने उलटले तरी अद्याप आवर्तन नेमके कधी सुटणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या नेतेगिरीचा परिणाम जलसंपदा विभागाच्या पाण्याच्या नियोजनावर झाला. दुसर्‍या इतर वितरिकांना शेतीचे पाणी उशिरा गेल्यामुळे त्या भागातील सिंचन पूर्ण होईपर्यंत वितरिका क्र. 18 चे आवर्तन लांबणीवर जाण्यास नेतेगिरी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. सांगवी परिसरातील शेतीचे आवर्तन लांबणीवर गेल्यामुळे या भागातील विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. दरम्यान या वितरिकेच्या आवर्तनाबाबत जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, दि. 1 ते 5 जूनदरम्यान शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT