पुणे : प्रेमाच्या नादात सर्वस्व हरवलेल्या ओडिशातील एका अल्पवयीन मुलीची कहाणी सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे. वयाच्या केवळ सतराव्या वर्षी घर सोडून आलेली ही मुलगी, गेल्या सहा महिन्यांपासून अनोळखी शहरात जगण्याचा संघर्ष करत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात, तर आई घरकाम करणारी. अशा परिस्थितीत शिक्षण घेत असताना ती एका तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांतील प्रेमसंबंध घट्ट झाले आणि विरोधाची पर्वा न करता ती प्रियकरासोबत घर सोडून पुण्यात आली. मात्र, सुखाचे स्वप्न दाखवणारा प्रियकर काही दिवसांतच तिच्यापासून दुरावला. या प्रेमाच्या कहाणी बरोबरच तिची आयुष्याची कहाणीही अधुरीच आहे.(Latest Pune News)
ओडिशा राज्यातून तिने प्रियकराबरोबर तिने पुणे गाठले. मात्र, प्रियकर तिला अर्ध्यातच सोडून पुन्हा ओडिशाला निघून गेला. कामाच्या शोधात दौंड रेल्वे स्थानकावर ती एकटी भटकताना रेल्वे पोलिसांना आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन महिला व बालकल्याण मंडळासमोर हजर केले. तिथेही तिने ठाम भूमिका घेतली- “मला माझ्या प्रियकरासोबतच राहायचे आहे.” घरच्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही तिला स्वीकारण्यास नकार दिला. “ती आमच्यासाठी आता मेली आहे,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
प्रियकराच्या विश्वासघातानंतरही ती अजूनही त्याचाच विचार करत आहे. हातावर कोरलेले त्याचे नाव आजही तिच्या भावनांचे प्रतीक आहे. गेल्या सहा महिन्यांत तिने अधिकाऱ्यांच्या घरी काम करून उदरनिर्वाह केला, पण मन मात्र ओडिशातच अडकलेले आहे. “मी सज्ञान झाल्यावर त्याच्याजवळ परत जाईन,” असा तिचा निर्धार आजही कायम आहे.
जेव्हा तिला ताब्यात घेतले, तेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता तिने स्वतःचे नाव लपवण्यासाठी मैत्रिणीचे नाव सांगितल्याचे उघड झाले. पुढील चौकशीत सत्य स्पष्ट झाले आणि तिच्या घरच्यांशी पुन्हा संपर्क साधण्यात आला. अखेरीस ते तिला परत न्यायला तयार झाले आहेत; मात्र मुलगी घरी जाण्यास नकार देत आहे. “मला घरी पाठवलं तर मी जीवाचं काहीतरी करेन,” अशी धमकी ती देत आहे.
लहान वयात भावनिक निर्णय घेणाऱ्यांसाठी ही कहाणी धडा असून प्रेमात वाहून न जाता आपल्या भविष्याप्रती जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मुलगी अत्यंत हुशार आहे, कॉन्व्हेंट शिक्षण घेतलेली आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तिचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. ती सध्या आमच्या ताब्यात असून तिची काळजी घेतली जात आहे. तिला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले जात आहे. केवळ वाईट हातात ती पडू नये हे आम्हाला वाटते.प्रमोद खोपीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस ठाणे.