पुणे

पुणे : कालवा रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत

अमृता चौगुले

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : कोथरूड, डेक्कन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या पाहता मुख्य रस्त्याला पर्याय म्हणून कालवा (कॅनॉल) रस्ता उपयुक्त ठरतो. परंतु, हा मार्ग सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. यामुळे दोन्ही रस्त्यांवरून
वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे लक्ष देऊन प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. खडकवासला येथून वारजे, कोथरूड, डेक्कनमार्गे कालवा पुढे जातो. सध्या हा कालवा बंदिस्त आहे. या ठिकाणी महापालिकेकडून डांबरी रस्ता करण्यात आला आहे.

मात्र, या रस्त्यावर खासगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून, दुकाने व टपर्‍या मांडल्या आहेत. भंगार साहित्याची दुकानेही परिसरात थाटली आहेत. तसेच काही ठिकाणी राडारोडादेखील टाकण्यात आला आहे. पदपथदेखील व्यावसायिकांनी व्यापले आहेत. तसेच या रस्त्याच्या कडेला वाहनांचे अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे. परिणामी, या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांची गैरसोय होत आहे.

मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कॅनॉल रस्ता उत्तम पर्यायी मार्ग ठरतो. मात्र, अतिक्रमणांमुळे या रस्त्याची रुंदी कमी आहे. तसेच पदपथांवरदेखील अतिक्रमणे झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. तसेच या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पाटबंधारे विभागाचा हा रस्ता महापालिकेला दिला आहे. यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची की पाटबंधारे विभागाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे दोन्ही प्रशासनांचे दुर्लक्ष होत असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अतिक्रमण विभागाला माहिती देणार
पथ विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, कालवा रस्त्यावर अतिक्रमणे झाली असतील, तर ती काढण्याबाबत तातडीने अतिक्रमण विभागाला कळविण्यात येईल. तसेच रस्त्यावरील राडारोड्याबाबतदेखील संबंधित विभागाला माहिती देण्यात येईल. मात्र, एवढ्या दिवसांपासून या रस्त्यावरील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष का नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कालवा रस्ता हा मुख्य रस्त्याच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता म्हणून उपयुक्त ठरतो. या रस्त्यावर सध्या खड्डे पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अतिक्रमणांमुळे या रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्येत आणखी भर पडत आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
– विशाल देशपांडे, रहिवासी, कर्वेनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT