पोलिसांसमक्ष कॅफेत अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल  Pudhari File Photo
पुणे

पोलिसांसमक्ष कॅफेत अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल

शाळा, कॉलेजच्या लगत असलेल्या या कॅफेवर पोलिसांची नजर

पुढारी वृत्तसेवा

खेड: ‘ती’ सुविधा तिथे होतीच. ‘ते’ अल्पवयीन मुलीसोबत आले. ज्याने त्याने आपापली जागा पकडली, पडदे लावले. अंधारल्या खोलीत मंद प्रकाशाने जागा घेतली आणि धुंदी चढणार तेवढ्यात कॅफेचालकाची कॉलर पोलिसांनी पकडली, त्यांचे निर्भया पथक साध्या वेशात अगोदरच ग्राहक बनून बसले होते.

राजगुरुनगर शहरातील एका कॅफेमध्ये सोमवारी (दि.17) दुपारी बारा वाजता घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाई नंतर कॅफेमध्ये तेच प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अल्पवयीन मुलीला कॅफेमध्ये बोलावून तिच्याशी जवळीक साधली..नंतर इंजेक्शन देऊन तिच्यावर पाशवी बलात्कार झाल्याचे ते अंगावर काटा आणणारे प्रकरण राजगुरुनगरकरांच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभे राहिले.

राजगुरुनगर शहरात किशोरवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी कॅफेचा उपयोग केला जात असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. कॅफेच्या नावाखाली कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लील वर्तन करता येईल अशी संशयास्पद बैठक व्यवस्था आणि स्वैराचार करणे सोपे होईल याची मुभा देणारी ही दुकाने शहराच्या ठरावीक भागात तेजीत आहेत. शाळा, कॉलेजच्या लगत असलेल्या या कॅफेवर पोलिसांची नजर गेली.

पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, निर्भया पथकाच्या स्नेहल राजे, उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील संशयास्पद चार कॅफेंची अचानक झाडाझडती घेतली. त्यात काही कॅफे बंद आढळले. मात्र, पाबळ रस्त्यावर असलेला मैत्री कॅफे सुरू होता. साध्या वेशात पोलिसांच्या पथकातील काही जणांनी कॉलेज सुटण्याच्या वेळेत या कॅफेतील त्या जागा पटकावल्या. पेय, खाद्यांची ऑर्डर दिली. त्यामुळे पोलिस बसल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. काही वेळाने कॉलेजची मुले आणि मुली येऊ लागली. त्यांना एकांत मिळावा म्हणून सगळे सुरू झाले.

अशातच कॅफेचालकाला रंगेहाथ पकडण्यात आले. सुजीत ठोंबरे याच्या विरुद्ध अश्लील कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलिस पूजा गारगोटे यांनी फिर्याद दिली आहे. महिला पोलिस सहायक निरीक्षक स्नेहल राजे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, पोलिस हवालदार नीलेश कोळसे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

गाळेधारकांवरही कारवाई होणार

राजगुरुनगर शहरात, जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर, पाबळ रोड या ठिकाणी अनेक कॅफे उभारण्यात आले आहेत. मुलांना नको ते करायला संधी देणार्‍या या कॅफेमधून वेगवेगळी पेय तसेच खाद्यपदार्थ विक्री केली जाते. त्यात काही मिसळले जाण्याचीसुध्दा शक्यता असताना जागामालकही त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेंना आपले गाळे भाड्याने देत आहेत. त्यांना याबाबत माहिती असूनही भाड्यापोटी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा गाळेमालकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे असल्याचे शहरात बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT