महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात कळंब, चांडोली बुद्रूक, चास, साकोरे, महाळुंगे पडवळ आदी गावातील शेतकर्यांनी कांदा बियाणे तयार केले आहे. सध्या बियाण्यासाठी लागवड केलेले कांदे फुलोर्यात आले आहेत. यंदा डेंगळ्याला पोषक वातावरण असल्याने भरघोस उत्पादन येणार असे चित्र सर्वत्र दिसत आहे. उत्पादित कांदा पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा लागवडक्षेत्रात दिवसेदिवस वाढ होऊ लागली आहे. परिणामतः कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण होऊन चढ्या बाजारभावाने शेतकर्यांना बियाणे खरेदी करावी लागते.
तसेच मिळणार्या बियाण्यातही भेसळ असल्याने नुकसान होते. त्यामुळे शेतकर्यांनी शेतात कांदा बियाण्याचे उत्पादन घेत आहेत. गेल्या तीन वर्षात कांदा बीजोत्पादनाकडे शेतकर्यांनी अधिक प्रमाणात लक्ष दिले आहे. करपा, मावा, लाल कोळी या रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने औषधांची फवारणी करावी लागते, त्यामुळे मधमाशांची हानी होऊन उत्पादन घटत चालल्याचे विका सोसायटीचे माजी चेअरमन भानुदास आवटे यांनी सांगितले.
लागवडीनंतर 140 ते 160 दिवसांच्यादरम्यान गोंड्यांमध्ये बियाणे भरल्यानंतर काळसरपणा दिसायला लागतो. गोंडे जसजसे तयार होतील, त्याप्रमाणे काढून घ्यावे लागतात. साधारणपणे तीन ते चारवेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी वेगळे करावे. त्यानंतर उफणनी बी स्वच्छ करावी.
– बाजीराव बारवे, संचालक, भीमाशंकर साखर कारखानाकांद्याच्या चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी गोल टपकळ कांदा निवडावा लागतो. त्यामध्ये कांद्याचे मधोमध दोन काप करून कांद्याच्या मुळाकडचा अर्धा काप जमिनीत गाडून त्याला येणार्या डेंगळ्यातून बी धरावे लागते. या प्रक्रियेतून तयार झालेले बी दर्जेदार व चांगल्या प्रतीचे असते. बाजारात भेसळयुक्त बियाणे मिळत असल्याने घरीच बियाणे तयार केले आहे.
– सदाशिव गाडे, शेतकरी, साकोरे