पुणे: एकेकाळी ’सायकलचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आत्ताच्या घडीला 40 लाखांहून अधिक वाहने धावत आहेत. यात सर्वाधिक दुचाकी आणि त्यानंतर चारचाकी वाहनांची संख्या आहे. पुणे आरटीओने नुकत्याचे दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.
शहरात एकूण 40 लाख 94 हजार 707 वाहने आहेत. यात सर्वाधिक दुचाकींची (मोटारसायकल/स्कूटर) संख्या आहे. तब्बल 28 लाख 4 हजार 540 दुचाकी सध्या पुणे शहरात धावत आहेत. तर खासगी चारचाकी आठ लाख 67 हजार 208 आहेत. याशिवाय इतर बस, ट्रक, टॅक्सी प्रवर्गातील अन्य चारचाकी वाहने देखील शहरात धावत आहेत. (Latest Pune News)
तसेच, एक लाख 34 हजार 2214 तीन चाकी प्रवासी वाहने आहेत. याशिवाय तीनचाकींमध्ये काही प्रायव्हेट आणि काही मालवाहू तीनचाकी देखील आहेत. यावरून आता पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यादृष्टीने आता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रादेशिक
परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पीएमपीएमएल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी काय ठोस उपाययोजना करत आहेत, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
वाहनसंख्या वाढीस वाहनकेंद्रित धोरणे कारणीभूत आहेत. पीएमपीचे खच्चीकरण, बीआरटीचा अंत, भरपूर उड्डाणपूल, पदपथांकडे दुर्लक्ष, याचा हा परिणाम आहे. यात आमूलाग्र बदल आणि वाहनसंख्या नियंत्रित करण्यासाठी धोरण, याची तातडीने गरज आहे.प्रांजली देशपांडे, वाहतूक अभ्यासक
पुणे शहर खूप मोठे आहे, त्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता सक्षम करणे महत्त्वाचे आहे. मात्र, पुण्याचा इतिहास पाहिला तर येथे अगोदरपासूनच रस्ते छोटे आहेत. ते वाढवताना खूप अडचणी येत आहेत. रस्ता रूंदीकरणासाठी लोक जागा देत नाहीत. डीपीमध्ये नवे रस्ते आहेत, ते झालेले नाहीत, नवे रस्ते करावे लागणार आहेत आणि रस्ते वाढवण्यासाठी नवीन भुसंपादन देखील करावे लागणार आहे. त्यादृष्टीने आमचे काम सुरू आहे.पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका