जीबीएसचे संकट गडद! रुग्णसंख्या 127 वर  file photo
पुणे

जीबीएसचे संकट गडद! रुग्णसंख्या 127 वर

सिंहगड रस्ता परिसर हॉटस्पॉट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत जीबीएसच्या एकूण 127 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 72 रुग्णांची निदाननिश्चिती झाली आहे, तर 2 संशयित मृत्यूची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.

जीबीएसच्या एकूण 127 रुग्णांपैकी 73 रुग्ण हे नव्याने पुणे महापालिकेंतर्गत समाविष्ट केलेल्या गावांमधील आहेत. उर्वरित 23 रुग्ण पुणे महापालिका, 13 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, 9 रुग्ण पुणे ग्रामीण व आणि 9 रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. यापैकी 20 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) उपचार घेत आहेत.

आजाराची सर्वसाधारण लक्षणे

  • अचानक पायात किंवा हातात येणारा अशक्तपणा/लकवा.

  • अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा.

  • डायरिया (जास्त दिवसांचा)

आत्तापर्यंतच्या उपाययोजना

  • राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट दिली.

  • महापालिका व जिल्ह्यातील बाधित भागामध्ये सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • रुग्णांचे 121 शौच नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आहेत. त्यापैकी 21 नोरो व्हायरस व 5 शौच नमुने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. 25 सीएसएफ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 नमुना ईपस्टीन बार व्हायरस पॉझिटिव्ह आला आहे.

  • एकूण 200 रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. सर्व नमुने झिका, डेंग्यू, चिकुनगुनियासाठी निगेटिव्ह आहेत.

  • शहराच्या विविध भागांतील 144 पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवलेल्या नमुन्यांपैकी 8 पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य आहेत.

  • जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे, असे आवाहन खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना केले आहे.

  • घरोघरी सर्वेक्षणअंतर्गत आजपर्यंत पुणे मनपा 34 हजार 177 घरे, पिंपरी-चिंचवड मनपा 7 हजार 852 घरे व पुणे ग्रामीण 10 हजार 254 अशा एकूण 52 हजार 283 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

काय काळजी घ्यावी?

  • पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून पिणे.

  • अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.

  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

  • शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न

  • खाऊ नये.

  • लोकांनी घाबरून न जाता या आजाराची

  • लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय

  • रुग्णालयात जावे.

सिंहगड रस्ता परिसर हॉटस्पॉट

सिंहगड रस्ता परिसरात जीबीएस रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, बुधवारी (दि. 29) नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी परिसरातील रुग्णसंख्या 55च्या वर गेल्या दिसून आले आहे. दरम्यान, बरे झालेल्या काही रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

85 आरोग्य पथके तैनात

रोगाची साथ सुरू झालेल्या नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरीसह सिंहगड रस्ता परिसरात पालिका व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 85 पथके तैनात केली आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, आरोग्य जागृती, साथ रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी आदींची माहिती दिली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT