पुणे

पुणे : म्हाडाच्या घरासाठी अर्जांची संख्या घटणार; अनामत रक्क्कम वाढवल्याचा परिणाम

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (म्हाडा) म्हाडाच्या सोडतीसाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य (एफसीएफ) या वर्गातील घरांसाठी अर्जासोबत भरायची अनामत रक्कम 50 हजार रुपये करण्यात आली आहे. तर अन्य वर्गातील रक्कम दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे घरांसाठी अर्ज करणार्‍यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

मध्यस्थांना रोखण्याबरोबरच गरजूंना त्याचा लाभ मिळावा यासाठी परवडणार्‍या घरांसाठी अर्जासोबत करावयाच्या अनामत रक्कमेत म्हाडाकडून वाढ करण्यात आली आहे. म्हाडा पुणे मंडळाकडून 5915 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यंदा अल्प आणि अत्यल्प गटांसाठीही अनामत रकमेत वाढ केली आहे. 20 टक्के योजनेतील घरांसाठीच्या रकमेतही दुप्पट वाढ केली आहे.

सोडतीत घर न लागलेल्या अर्जदारांना अर्जाचे शुल्क वजा करून रक्कम परत केली जाते. घराच्या आशेने मोठ्या संख्येने इच्छुक अर्जदार एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज करतात. या प्रत्येक अर्जामागे अनामत रक्कम भरावी लागत आहे. मध्यस्थांना रोखण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे. सोडतीसाठी एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज करणार्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

एफसीएफ या वर्गवारीतील घरांसाठी अर्ज करणार्‍यांच्या अनामत रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. कारण या वर्गवारीत प्रथम अर्ज करणार्‍यांना लगेच घर मिळणार आहे, हे त्यामागे कारण आहे. त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे, अशाच नागरिकांनी अर्ज करावा, हा त्यामागे हेतू आहे. तर नेहमीच्या वर्गवारीतील घरांसाठीच्या अनामत रकमेत थोडी वाढ करण्यात आली आहे.
                                                           – नितीन माने-पाटील,
                                                        मुख्य अधिकारी म्हाडा, पुणे

SCROLL FOR NEXT