पुणे

पुणे : एनएसएसमुळे तरुणाई विकासाच्या दिशेने जाईल; राजेश पांडे यांचे मत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राज्यभरातील तरुणाईला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. त्या आधारे तरुणांमध्ये आपल्या भविष्याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी ही योजना निश्चितपणे वापरतील, असा विश्वास योजनेच्या राज्य समितीचे सल्लागार राजेश पांडे यांनी शनिवारी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन आणि जी-20 परिषदेनिमित्ताने पुण्यात नजीकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रामध्ये पांडे यांनी संवाद साधला.

या वेळी पोपटराव पवार, मिलिंद कांबळे, 'तेर पॉलिसी'च्या विनिता आपटे, 'भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान'चे डॉ. प्रसाद देवधर, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे आदी उपस्थित होते. पांडे म्हणाले, की योजनेचा सल्लागार म्हणून राज्यातील 'एनएसएस'ला नवे रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे अधिवेशन आणि त्याआधारे राज्यभरात 40 लाख युवकांशी होणारा सकारात्मक युवा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. देशाच्या युवा पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विश्वगुरू म्हणून जगासमोर घेऊन येतील. त्यासाठी राज्यभरातील युवक सक्षम होण्यासाठी हे अधिवेशन उपयुक्त ठरेल.

पवार यांनी 'एनएसएस' आणि 'एनसीसी' या योजनांची उपयुक्तता उपस्थितांसमोर मांडली. हे विषय सक्तीचे करून त्या आधारे युवकांना मूल्यशिक्षण, संस्कार आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठीचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. देशासमोरील समस्या सोडविण्यासाठी असे प्रशिक्षण घेतलेली पिढी उपयुक्त ठरणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. स्वामीराज भिसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भोसले यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT