पुणे

मंचर : शालेय बसगाड्यांची तपासणी अत्यंत गरजेची; अपघातानंतरही आरटीओ प्रशासन शांतच

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस काही दिवसांपूर्वीच दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात 44 विद्यार्थी जखमी झाले होते. या अपघातानंतर शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कूल बसबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने शालेय बसची तपासणी करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी गरजेची आहे.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी अनेक जुन्या बसगाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या बस चांगल्या व सुस्थितीत असाव्यात, अशी माफक अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर इंग्लिश मीडियम स्कूल उभे राहिले आहेत. या शाळांच्या माध्यमातून दूरवरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठविले जाते. त्यासाठी बसची व्यवस्था केली जाते. तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था ग्रामीण भागात सुरू आहेत. या ठिकाणीदेखील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसचा वापर केला जातो.

सध्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी अनेक बसगाड्या रस्त्यावर चालू आहेत. काही बस नवीन आहेत, काही चांगल्या सुस्थितीत आहेत. मात्र काही ठिकाणी जुन्या बसगाड्यांचा वापरही केला जातो. काही शहरातून बंद केलेल्या बसगाड्या ग्रामीण भागात वापरल्या जातात. तसेच काही ठिकाणी रिक्षा, सहाआसनी रिक्षा, ओमनी गाड्या यांचाही वापर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच धोकादायक पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे या सर्व बसगाड्यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे ठरले आहे.

पालक आणि शाळा प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक
सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करत असताना विद्यार्थ्यांचे घर ते शाळा या दरम्यान वाहने उपलब्ध आहेत का? नसेल तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही वाहनातून प्रवास करणे योग्य नाही. या गोष्टींची काळजी शाळा प्रशासन व पालकांनी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अनेक शाळा नावाजलेल्या आहेत. त्या ठिकाणी दूरवरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शाळा, विद्यालये अ‍ॅडमिशन देतात, परंतु त्यांची ने -आण करण्याबाबत कुठलीही जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे पालक आणि स्थानिक लोकांनी याकडे लक्ष देणेदेखील गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT