दिगंबर दराडे
पुणे: सध्या पुण्यात रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात बूम सुरू आहे. अनिवासी भारतीय नागरिकदेखील ‘सेकंड होम’ म्हणून पुण्यालाच पसंती देत आहेत. पुणे रिअल इस्टेट बाजारात जानेवारी ते जून 2025 या कालावधीत पुण्यात 1 लाख 16 हजार 43 मालमत्तांची नोंदणी झाली. ही नोंदणी 2024 च्या याच कालावधीतील 99 हजार 908 नोंदणींपेक्षा 16 टक्के अधिक आहे.
महाराष्ट्रात एप्रिल-जून 2025 दरम्यान दरमहा सरासरी 3.7 लाख प्रॉपर्टीच्या नोंदणी झाल्या. महसूल 4 हजार कोटींच्या आसपास राहिला, यामध्ये सर्वाधिक आघाडीवर पुणे शहर राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Pune News)
मेट्रो कॉरिडॉर, वाहतुकीच्या विस्तारामुळे हिंजवडी, वाकड, बाणेर, खराडी, रावेत, औंध, पाषाण, सूस, पिंपरी- चिंचवड परिसरात प्रीमियम घरांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. मेट्रो स्टेशनपासून 500 मीटर आतल्या प्रॉपर्टीचे दर 10-25 टक्के वार्षिक वाढले आहेत. पुण्यातील 1 कोटीपेक्षा जास्त किमतीची खरेदी 21 टक्के झाली आहे.
पुणे ‘फर्स्ट चॉइस’ निवडले जात आहे. व्यावसायिक, तंत्रज्ञान, औद्योगिक विकास ः खासकरून आयटी कंपन्यांच्या विस्तारामुळे पुण्यातील प्रॉपर्टी बूम वाढत आहे. पुणे रिअल इस्टेट क्षेत्रात 2025 च्या पहिल्या सहामाहीत नवा विक्रमी उच्चांक झाला आहे.
पुणे शहरात 2025 च्या जून महिन्यात मालमत्ता नोंदणीमध्ये 13 टक्के वाढ झाली असून, 16 हजार 597 मालमत्ता नोंदविण्यात आल्या. याच महिन्यात मुद्रांक शुल्कातून 637 कोटींची महसूलवाढ झाली आहे. ही गेल्या काही वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
घरांच्या व्यवहारांत यंदा काय बदल झाले?
एक कोटीपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री 21% वर पोहचली, जी जून 2024 मध्ये 15% होती.
1 कोटीखालील घरांची विक्री अजूनही बाजारावर वर्चस्व गाजवत आहे, 79% विक्री या गटात झाली आहे.
मे 2025 मध्ये 12,037 मालमत्ता नोंदविण्यात आल्या आणि 426 कोटींचे मुद्रांकशुल्क जमा झाले आहे.
800 चौरस फुटांपेक्षा मोठ्या सदनिका विक्रीमध्येही वाढ दिसून आली. जून 2025 मध्ये अशा सदनिकांची नोंदणी 34 टक्के झाली, जी मागील वर्षी 31 टक्के होती.
पुणे आता केवळ शिक्षणाचे केंद्र नाही, तर देशातील गुंतवणुकीसाठी देखील भारतातील हॉटस्पॉट बनलेय. पुण्यात मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे. त्यांना या ठिकाणी घर घेणे सोपे जात आहे. आयटी कंपन्यांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेले आहेत. यामुळे स्थलांतरदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.- सतीश मगर, बांधकाम व्यावसायिक बँकांच्या कर्जाचे दर आता कमी झाले आहेत.
याचा फायदा घेण्यासाठी सर्वाधिक ग्राहकांकडून घरखरेदीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहेत. पुण्यामध्ये विकासाचे प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याचा अधिकाधिक फायदा नागरिकांना होणार आहे. रिंगरोड, मेट्रो, विमानतळाचे विस्तारीकरण यामुळे प्रामुख्याने नागरिकांची पुण्याला पंसती मिळत आहे.- मनीष माहेश्वरी, बांधकाम व्यावसायिक